मण्यारने दंश करूनही मोठ्या कल्पकतेने वाचवले तरुणाचे प्राण

सुरेश कातकरी हा अंगणात झोपला असताना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सापाने त्याच्या हाताला दंश केला
मण्यारने दंश करूनही मोठ्या कल्पकतेने वाचवले तरुणाचे प्राण

मण्यारसारख्या अतिविषारी सापाने दंश करूनही सर्प मित्राच्या कल्पकतेमुळे एका २२ वर्षीय आदिवासी तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले. उरणच्या पुणादे गावातील सुरेश कातकरी या तरुणाला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मण्यारने दंश केला. विष त्यांच्या अंगात पसरत असतानाही जयवंत ठाकूर या सर्पमित्राने त्याला रुग्णालयात नेईपर्यंत एक तास बोलण्यात गुंतवले. त्यामुळे त्याच्या शरीरात विष भिनण्याची गती मंदावली अन त्याचे प्राण वाचले.

सुरेश कातकरी हा अंगणात झोपला असताना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सापाने त्याच्या हाताला दंश केला. त्याच्या कुटुंबातील लोक भयभीत झाले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने निसर्ग मित्र संस्थेच्या जयवंत ठाकूर यांना पाचारण करण्यात आले. मण्यार या अतिविषारी सापाने त्याला चावल्याचे ठाकूर यांच्या लक्षात आले. त्यामुळे सुरेशला तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र गावातील सार्वजनिक आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे त्याला इतरत्र हलवावे लागणार होते. पण वेळ कमी होता. त्याला नवी मुंबईतील वाशीच्या महापालिका रुग्णालय नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मण्यारच्या विषाने किमान २० माणसे मरू शकतात किंवा एखादा महाकाय हत्ती गतप्राण होऊ शकतो.

ठाकूर यांनी सुरेशला याच्या गांभीर्याची कल्पना दिली नाही. तुला काय होणार नाही. तू बरा होशील असे सांगत त्याला इतर गप्पांमध्ये गुंतवले. परिणामी त्याच्या शरीरात विष भिनण्याची गती मंदावली. वाशीच्या रुग्णालयात पोहचताच सुरेशला उलट्या सुरू झाल्या. मात्र डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि तरुणाचे प्राण वाचले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in