मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाणगंगा तलाव परिसरातील पायऱ्यांचे नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने कंत्राटदाराविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नासधूस झालेल्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आले आहे.
बाणगंगा ही ऐतिहासिक पुरातन वास्तू आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरवस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवर बांधकामे झाली होती. यास्तव, महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्तरावर झालेल्या बैठकांनुसार तसेच राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार पालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेचा विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून घोषित करून महानगरपालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेअंती पुरातन वारसा कामे (हेरिटेज) कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी बाणगंगा तलाव येथे स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी संयंत्रामुळे हानी झालेल्या पायऱ्या लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते.
बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, मलबार हिल पोलिस ठाणे येथे प्रथम माहिती तक्रार (क्रमांक एफ आयआर, सीआर नंबर १५५/२०२४ मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामे सुरू
बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा
तलाव परिसरातील दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन
बाणगंगा तलावामध्ये आकर्षक विद्युत रोशणाई
बाणगंगा तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटवणे
रामकुंड या ऐतिहासिक, पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन
बाणगंगा परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे व योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे.
बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे