तापमान, प्रदूषणास कारणीभूत हॉटस्पॉटचा शोध; तापमान नियंत्रणासाठी उपाययोजना करणार

वातावरणीय बदलांमुळे कधी तापमानात वाढ तर कधी प्रदूषणात वाढ होत आहे. मुंबईत नेमक्या कोणत्या भागात तापमानात वाढ होते, याचा शोध मुंबई महापालिकेचा पर्यावरण विभाग व निरी संस्था घेत आहे.
तापमान, प्रदूषणास कारणीभूत हॉटस्पॉटचा शोध; तापमान नियंत्रणासाठी उपाययोजना करणार

मुंबई : वातावरणीय बदलांमुळे कधी तापमानात वाढ तर कधी प्रदूषणात वाढ होत आहे. मुंबईत नेमक्या कोणत्या भागात तापमानात वाढ होते, याचा शोध मुंबई महापालिकेचा पर्यावरण विभाग व निरी संस्था घेत आहे. सद्यस्थितीत मुलुंड टोल नाका, भक्ती पार्क सायन चेंबूर रोड, माहुल ट्रॉम्बे इंडस्ट्रियल व कांदिवलीतील गणेश नगर येथे तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याठिकाणी अधिकाधिक झाडांची लागवड, वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे, असे उपाय नजीकच्या काळात करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

होळीनंतर मुंबईतील तापमानात वाढ होत असून सध्या सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ असून मायानगरी मुंबई, ठाण्यासह राज्यात उन्हाच्या तडाख्यामुळे लोक हैराण झाले आहेत. शनिवार ते सोमवार या तीन दिवसांत तर मुंबईतील तापमान तर ३९ अंश सेल्सिअस पार गेले. तर ठाण्यात तापमान ४२ अंश सेल्सिअस पार गेल्याने उन्हाचे चटके बसत होते. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.

मुंबईत वाढणारे प्रदूषण आणि तापमान, याला नेमकी कारणे काय आहेत, मुंबईत कुठल्या भागात तापमानात अधिक वाढ होते, याचा शोध घेतला जात आहे. मुंबईतील हॉटस्पॉटचा शोध घेतला असता, सद्यस्थितीत चार ठिकाणी हॉटस्पॉट आढळले असून त्याठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासह प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे होणार काम

  • मुंबईत विशेषत: उद्योग, बांधकामे सुरू असलेल्या भागात उष्णता सर्वाधिक असल्याचा अंदाज आहे. शिवाय बेकरी व्यवसाय असणारे भाग, लोखंडी कामे होणारे भाग, स्टील व्यवसाय आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी ‘हॉटस्पॉट’ (उष्णता असणारे) भाग शोधले जातील.

  • ‘हॉटस्पॉट’असलेल्या भागात उष्णता कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल. उद्योग-व्यवसायातील कामे, कमीत कमी उष्णता निर्माण होतील, यासाठी उपाययोजना सुचवण्यात येतील. मोठ्या प्रमाणात वाहने असणाऱ्या ठिकाणी, सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी स्प्रिंकलर, प्रदूषण दूर करणारी यंत्रणा बसवण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in