Mumbai : प्रीमियमध्ये सूट, हीच मोठी चूक!

बांधकाम अन् सिमेंटचे रस्ते मुंबईसाठी घातक, प्रदूषणास पालिका (Mumbai) जबाबदार; पर्यावरण तज्ज्ञांचा आरोप
Mumbai : प्रीमियमध्ये सूट, हीच मोठी चूक!

मुंबईकरांच्या (Mumbai) सृदृढ आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असल्याची ओरड नेहमीच मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येते. तरीही मुंबईची हवा बिघडली असून मुंबईतील धुळीच्या साम्राज्याला नेमके जबाबदार कोण, खरंच बांधकामांमुळे मुंबईत धूळ पसरली आहे का, धूळमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना उपयुक्त ठरणार का, सात समिती सदस्यीय समितीकडून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश या सगळ्यामुळे भविष्यात मुंबई खरोखरच धूळ मुक्त व मुंबईकरांना शुद्ध हवा घेणे शक्य होईल का, या विषयी पर्यावरण तज्ज्ञ, मुंबईकर व मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून यांच्याशी दैनिक 'नवशक्ति'ने केलेली खास बातचीत.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील हवा खालावली असून मुंबईला प्रदुषणाचा विळखा बसला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाचे विकार झपाट्याने पसरत आहे. मुंबईतील हवा अशुद्ध होण्यामागे मुख्य कारण बांधकाम असल्याचे दस्तुरखुद्द मुंबई महापालिका प्रशासनाने स्विकारले आहे. महसूल वाढीसाठी पालिका प्रशासनाने प्रिमियम मध्ये ५० सूट दिली आणि मुंबईत गगनचुंबी इमारती उभारण्याची विकासकांमध्ये जणू शर्यतच लागली आहे. मुंबईत उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींच्या बांधकामासाठी परवानगी दिली जाते ती मुंबई महापालिकेकडून. त्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला मुंबई महापालिकाच कारणीभूत आहे, असा आरोप पर्यावरण तज्ज्ञ देबी गोयंका यांनी केला आहे.

दोन वर्षांत मुंबईतील रस्ते सिमेंट, काँक्रिटचे होणार असून यासाठी संपूर्ण मुंबईत खोदकाम करण्यात येणार असून काही ठिकाणी खोदकाम सुरू आहे. सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यावर भर दिला जात असला तरी वाढत्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. डिसेंबर २०२२मध्ये जी २० परिषदेचे आयोजन केले, त्यावेळी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत पाण्याची फवारणी केली. जी २० परिषदेसाठी आलेल्या देशविदेशातील प्रतिनिधी ज्या रस्त्यावरुन ये-जा करणार त्या रस्त्यावरील पॉटहोल बुजवले. त्यामुळे मुंबई प्रदूषण मुक्तीसाठी जी २० परिषदेसाठी आलेल्या देशविदेशातील प्रतिनिधींनी मुंबईत कायमचे वास्तव्य करावे जेणेकरून मुंबईत प्रदूषण होणार नाही, असा टोला देबी गोयंका यांनी लगावला. मुंबईत हाय राईज इमारती उभारल्या जात असून यामुळे हवा अडली जाते. त्यामुळे भविष्यात हाय राईज इमारतीबाबत मुंबई महापालिकेने काही नियमावली तयार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुंबईत विकास कामे झपाट्याने सुरू असून विकास कामांसाठी झाडांची कत्तल केली जाते. मात्र मुंबई महापालिका म्हणते आम्ही लाखो झाडांची लागवड केली. परंतु प्रत्यक्षात ज्या ठिकाणी झाडांची लागवड केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो, त्याठिकाणी तीन महिन्यांनंतर पाहणीस गेल्यास त्याठिकाणी झाडाचे दृष्टीस पडत नाही, असा आरोप गोयंका यांनी केला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मुंबई महापालिकेला खरंच रस असेल, तर ड्रममध्ये झाड लावा आणि दोन तीन वर्षे झाड तसं ठेवून ७ ते ८ फुटांचे झाड झाल्यावर ते झाड तुम्ही मुंबईत लावा, अशी सूचना मुंबई महापालिकेला केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी कागदावरच दिसून येते. तसेच ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्यासाठी मुंबईकरांमध्ये जनजागृती करा, मात्र त्याची पुरेपूर अंमलबजावणी केली नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

वाहनांची वाढती संख्या कारणीभूत

मुंबईत वाहनांची संख्या ४५ ते ५० लाखांच्या घरात पोहोचली असून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यातच उत्तुंग इमारती उभारल्या जात असून यामुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. तसेच गरज नसताना सिमेंटचे रस्ते करण्याचा खटाटोप घातला आहे. मुंबई शहर व उपनगराला जोडणारा वांद्रे माहिम दरम्यानचा लेडी जंक्शन रोड हा १८४६ साली म्हणजे १७५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला. आजही तो रस्ता मजबूत व टिकाऊ आहे. त्यामुळे सिमेंटचे रस्ते हा चुकीचा पायंडा घातला जात असून मुंबई महापालिकेची तिजोरी खाली करण्याचे मुंबई महापालिका, माजी नगरसेवक व राजकीय नेत्यांचा डाव आहे, असा आरोप पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांनी केला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मुंबईत खाजगी वाहनांची संख्या कमी करत सार्वजनिक बस सेवा वाढवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई धुळ मुक्तीसाठी ७ सदस्यीय समिती स्थापन केली असून ही धूळ फेक आहे. मुंबईत चुकीच्या पद्धतीने विकास होत असून मुंबईसाठी घातक आहे, असा इशारा राऊत यांनी दिला. त्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणास मुंबई महापालिकेचा नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

गोयंका यांनी केलेल्या सूचना

* ड्रममध्ये झाड लावा आणि दोन-तीन वर्षांनंतर ८ फुटांचे झाल्यावर लावा.

* ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणासाठी मुंबईकरांमध्ये जनजागृती करा.

* रस्त्यांवर स्ट्रीट लाईट लावताना वरील भागात शेड लावणे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in