
आज राज्यभर धुळवड जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाजपनेही मुंबईमध्ये होळीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीदेखील हजेरी लावत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. ते म्हणाले की, "मी विधानसभेत म्हणालो होतो की खूप लोकांनी मला त्रास दिला आहे. त्या सगळ्यांचा बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की, आम्ही त्या सगळ्यांना माफ केले. आमच्या मनात आता कोणाबद्दलही कटुता नाही,"
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " विविध रंगांनी जशी होळी साजरी केली जाते, तशाच प्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेला असेल. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले. "अनेकदा होळीला आमच्या काही मित्रांना खोटे सांगून, भांग वगैरे पाजून दिली. त्यानंतर दिवसभर त्यांचे जे काही सुरु होते, कोणी गाणे गात होते, तर कोणी रडत होते. हे सगळे पाहून मजा आली. पण अशी नशा करण्यापेक्षा भक्तीची, संगीताची, कामाची नशा करावी.", अशी टोलेबाजी त्यांनी केली.