मुंबई ही महाराष्ट्राची, कुणाच्या बापाची नाही ; कर्नाटक मंत्र्याच्या विधानावर उपमुख्यमंत्र्यांनी सुनावले

कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी मुंबईवर केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले
मुंबई ही महाराष्ट्राची, कुणाच्या बापाची नाही ; कर्नाटक मंत्र्याच्या विधानावर उपमुख्यमंत्र्यांनी सुनावले
Published on

महाराष्ट्रामध्ये कर्नाटकविरोधी ठराव संमत झाल्यानंतर कर्नाटकमधील सरकार बिथरले असल्याचे समोर आले आहे. कारण, कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी कर्नाटक विधानसभेत, 'मुंबई केंद्रशासित करा' असे वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळात याचा परिणाम झाला. 'मुंबई कोणाच्या बापाची नाही, ती महाराष्ट्राचीच आहे.' असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावले. तसेच, बोलघेवड्या मंत्र्यांना तंबी द्या, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी विधिमंडळात म्हणाले की, "मुंबई ही महाराष्ट्राची आहे. त्यावर जर कोणी दावा करत असेल तर ते खपवून गेहटले जाणार नाही. गृहमंत्री अमित शहांकडे झालेल्या बैठकीमध्ये जे ठरले आहे, त्याचे उल्लंघन कर्नाटक सरकार वारंवार करत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. गृहमंत्र्यांना पत्र लिहीत याचा निषेध करणार आहे. तसेच, ही गोष्ट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, कोणाच्या बापाची नाही." दरम्यान, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीदेखील कर्नाटकच्या मंत्र्याने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

महाराष्ट्राने विधिमंडळात कर्नाटक विरोधी ठराव संमत केल्यानंतर कर्नाटकमध्ये त्याचे पडसाद उमटले. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण हे बरळले. ते म्हणाले की, "केंद्रशासित प्रदेशांच्या घोषणेवर चर्चा करायची असेल, तर आधी मुंबई केंद्रशासित करा. केंद्रशासिक प्रदेशांच्या घोषणेवर चर्चा करायची असेल, तर आधी मुंबई केंद्रशासित करा. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या कमी असून २० टक्के कानडी लोक तिथे राहतात." असा जावईशोध त्यांनी लावला.

logo
marathi.freepressjournal.in