
मुंबई : दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत ६५ कंपन्यांबरोबर करार करत १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचे स्वागतच आहे. याआधीही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक व रोजगार निर्मिती उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नेमकी किती गुंतवणूक, किती रोजगार उपलब्ध होणार याची माहिती राज्यातील जनतेला मिळणे गरजेचे आहे. यासाठी महायुती सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे मद्य कंपनीशी करार करत महाराष्ट्राला दारूराष्ट्र करणार का?, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दावोसमध्ये फडणवीस यांनी करार केलेल्या ६१ कंपन्यांमधील ५१ कंपन्या भारतातीलच आहेत. तर काही कंपन्यांची कार्यालये मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरच आहेत. फक्त दहा कंपन्या विदेशातील आहेत. सिडको आणि बुक माय शो यांच्या मध्ये दावोस येथे १५०० कोटी रूपयांचा करार करण्यात आला. कोल्ड प्लेच्या तिकीट विक्रीचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळाबाजार करण्याची सूट देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.