“नेहमीप्रमाणे त्यांचं रडगाणं सुरु झालंय...”, उद्धव ठाकरेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!

मुंबईत ज्या ठिकाणी शिवसेनेची मतं जास्त आहेत, अशा ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.
उद्धव ठाकरेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

मुंबई: आज देशभरात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील १३ लोकसभा जागांचाही पाचव्या टप्पात समावेश होता. आज मुंबईत मतदानादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी ५ वाजता तातडीनं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली. मुंबईत ज्या ठिकाणी शिवसेनेची मतं आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु असून निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी रडगाणं सुरू केलं आहे, असं ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका."

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय....

उद्धव ठाकरे म्हणाले की, "निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, हे स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे, पण मतदान केंद्रात बसलेले निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी खूप दिरंगाई करतायेत. विशिष्ट वस्त्यांतील मतदारांची नावे तीन-चारवेळा चेक केली जातायेत. ज्येष्ठ मतदारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. महिलांना त्रास होतोय. पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. तरीही मतदार रांगा लावून उभे आहेत. मोदी सरकार निवडणूक आयोगाचा उपयोग घरगड्यासारखा करतोय. मत नोंदवताना दप्तदिरंगाई होत आहे."

पहाटे पाच सहा जरी वाजले, तरी सोडू नका....

मतदारांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, "थोडा वेळ राहिला असला तरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. मतदान केंद्रात जाऊन उभे राहा. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी आज कितीही वाजले, अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले, तरी सोडू नका. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका."

logo
marathi.freepressjournal.in