‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासाला मिळणार वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासाला मिळणार वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासाला मिळणार वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास(Photo-X)
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि ‘मुंबई ३.०’ अर्थात ‘तिसऱ्या मुंबई’च्या नियोजित विकासासाठी सिंगापूरमधील टेमासेक, सुरबाना ज्युराँग आणि मॅपलट्री या जागतिक दर्जाच्या संस्थांसोबत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आले. या भागीदारीमुळे रायगड-पेण परिसरात १.१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक परकीय थेट गुंतवणूक येण्याची शक्यता असून, उद्योग, रोजगार आणि आधुनिक नागरी विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), रायगड-पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड (आरपीजीसीएल), टेमासेक, सुरबाना ज्युराँग आणि मॅपलट्री यांच्यात विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नीती आयोगाने एमएमआरमध्ये १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रायगड परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूरच्या अनुभवी संस्थांशी झालेली भागीदारी ‘मुंबई ३.०’ च्या विकासासाठी निर्णायक ठरेल. पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असल्याने देश-विदेशातील गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. शहरी नियोजन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाची शहरे उभारण्यात सिंगापूरचा मोठा अनुभव असून त्याचा लाभ महाराष्ट्राला होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रायगड-पेण ग्रोथ सेंटरच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून सुरबाना ज्युराँगची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगड-पेणमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प

रायगड-पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकरांवरील मिश्र-वापर (मिक्स्ड-यूज) विकास प्रकल्पासाठी करार करण्यात आला आहे. या प्रकल्पात आवश्यक भांडवली गुंतवणूक केली जाणार असून जागतिक कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

तिसऱ्या मुंबईसाठी मास्टर प्लॅन

‘मुंबई ३.०’च्या नियोजित विकासासाठी सुमारे ३२४ चौरस किलोमीटर क्षेत्राचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात जमिनीचा वापर, वाहतूक व्यवस्था, गृहनिर्माण, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रे, सामाजिक सुविधा आणि अन्य नागरी पायाभूत सुविधांचे एकात्मिक नियोजन करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने आणि शाश्वत पद्धतीने विकास करण्यासाठी हा मास्टर प्लॅन मार्गदर्शक ठरणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in