

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात असे आशिष शेलार म्हणाले. पण, आशिषजी २०१९ पर्यंत उद्धवजींनी जेव्हा जेव्हा मला फोन केला तेव्हा तेव्हा मी आलो. पण २०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलावलेच नाही, नाहीतर मी गेलो असतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांसाठी एक दालन उभे करण्यासाठी प्रयत्न करु. यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मदत घेऊ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या मराठी व्यंगचित्रकलेचा १०० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
व्यंगचित्रकार हा उत्कृष्ट चित्रकार असलाच पाहिजे असे सांगतानाच, वेड्या वाकड्या रेखोट्या मारणं म्हणजे व्यंगचित्र नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
२०२९पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं असा मिश्किल टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आशिष शेलार यांना लगावला.