
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी धुरा सांभाळली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला जातील, असे बोलले जात होते. मात्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाणे टाळल्याने वर्षा बंगल्यावर काही अद्भूत असल्याने फडणवीस जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र बुधवारी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत पूजा अर्चा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. याबाबत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली.
दिवीजा हिची दहावीची परीक्षा असल्याने फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या जुन्याच घरी म्हणजे सागर बंगल्यावर राहत होते.
तसेच त्या ठिकाणी डागडुजीचे काम शिल्लक होते. त्यामुळे मुलीची परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.