

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’, ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग्ज फ्री भारत' घडविण्याचा सामूहिक निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येत्या दोन ते चार वर्षात मुंबईत ‘ड्रग्ज फ्री’ करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी वरळी डोम येथे ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून भारताला आतून कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ड्रग्ज हे या छुप्या युद्धातील सर्वात धोकादायक शस्त्र असून, त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा समजून लढला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचे डोळे आणि कान असून, व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या व्यक्तींबाबत तसेच ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन केले.
राज्यातील विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना ठामपणे विरोध करण्याचा ठाम निर्धार केल्यास त्यांना व्यसनाच्या आहारी नेता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचे डोळे आणि कान असून, व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या व्यक्तींबाबत तसेच ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकचळवळ बनवूया!
'ड्रग फ्री मुंबई' हे केवळ शासनाचे अभियान नसून समाजाच्या सक्रिय सहभागातून उभी राहणारी व्यापक जनचळवळ असल्याचे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबई पूर्णपणे अमली पदार्थमुक्त होईपर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून, प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.