

मुंबई : ‘देशात सरकार बदलण्याच्या नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था, भारतीय संविधान आणि लोकशाहीने निर्माण केलेल्या संस्था उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून ‘रेजिम चेंज’चे षडयंत्र रचले जात आहे. मात्र, आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही आणि लोकशाहीवर संकट येऊ देणार नाही’, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. त्याचवेळी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणे भारतातही राजकीय व्यवस्था बदलण्याचे मनसुबे विरोधकांनी आखल्याचा आरोपही त्यांनी केला.
संविधान, लोकशाही वाचवण्याची लढाई...
या पदयात्रेला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला. ‘गव्हर्नमेंट चेंज’ आणि ‘रेजिम चेंज’ यात मोठा फरक आहे. लोकशाहीत निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, ‘रेजिम चेंज’ म्हणजे राजकीय व्यवस्था, संविधान आणि देशातील सर्व संवैधानिक संस्था बदलणे होय. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून याच उद्देशाने आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदांमध्ये वारंवार ‘रेजीम चेंज’ची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्याला समर्थन दिले. त्यामुळे ही लढाई केवळ राजकीय पक्षांची नसून देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्याची असल्याचे फडणवीस म्हणाले.
संविधानाचा खरा मारेकरी भाजपच - सपकाळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान आणि लोकशाहीवरून काँग्रेसवर आरोप करणे हास्यास्पद आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच मान्य नाही. भाजपाच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती आहे. त्यामुळे भाजपची ‘लोकशाही आणि संविधान बचाओ’ची आगपाखड म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. संविधान आणि लोकशाहीचे खरे मारेकरी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.