देवीला अर्पण केलेल्या साड्यांची आदिवासी महिलांना भेट; श्री गांवदेवी प्रासादिक ट्रस्टचा अनोखा उपक्रम
तेजस वाघमारे / मुंबई
काही मंडळे नवरात्र उत्सवात देवीला अर्पण केलेल्या साड्यांचा लिलाव करतात. मात्र दहिसर पूर्वेकडील श्री गांवदेवी प्रासादिक ट्रस्ट नवरात्र उत्सवात देवीला अर्पण केलेल्या साड्या आदिवासी भागातील महिलांना दान करतात. यासोबतच मंडळाला मिळालेल्या देणगीतून आणि पदाधिकारी वैयक्तिक निधी उभारून आदिवासी भागातील लहान मुलांचीही दिवाळी आनंदी बनवतात. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्ट हा उपक्रम राबवत असून तो इतर नवरात्रोत्सव मंडळांसाठी आदर्श ठरला आहे.
दहिसर येथील श्री गांवदेवी प्रासादिक ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करत आहे. ट्रस्टची स्थापना १९७९ साली झाली. तर मंदिराचा पुनर्जिर्णोद्धार २००९ मध्ये बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.
नवरात्र उत्सवा दरम्यान भाविक देवीला शेकडो साड्या अर्पण करतात. या साड्यांचा लिलाव किंवा विक्री न करता ट्रस्ट या साड्या वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांना वाटप करते. नवरात्रोत्सव संपल्यावर ट्रस्टतर्फे आदिवासी भागातील लहान मुले आणि महिलांसाठी नवीन कपडे, दिवाळी फराळ याची तयारी केली जाते. दिवाळीत आदिवासी भागात जाऊन महिला आणि लहान मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात येते. यासाठी ट्रस्ट अतिदुर्गम भाग निवडून त्याठिकाणी साहित्य आणि वस्तूंचे वाटप करत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र केणी यांनी सांगितले.
सामाजिक उपक्रम
ट्रस्ट नवरात्र उत्सव साजरा करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. नवरात्र उत्सव काळात येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, रक्तदान शिबिर, भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दसऱ्याच्या दिवशी ट्रस्टतर्फे सोने लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये विभागातील अनेक लोक सहभागी होतात. उत्सव काळात ट्रस्ट विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवते. या व्यतिरिक्त ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर, शालेय वस्तूंचे वाटप, अन्नदान असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात.