डीजी प्रवेश ॲप कार्ड लंपास; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी झालेल्यांना डीजी ॲप प्रवेश कार्ड (आरएफआयडी) देण्यात येते. यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने तब्बल ८ हजार कार्ड बनवले. अभ्यागतांना दिलेले कार्ड बॉक्स मध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र ८ हजार कार्ड पैकी ३,५०० कार्ड अभ्यागतांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
डीजी प्रवेश ॲप कार्ड लंपास; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस
Published on

मुंबई : मंत्रालयात प्रवेश करताना तासनतास रांगेत उभे राहण्याची कटकट यापासून अभ्यागतांना दिलासा मिळावा यासाठी आणि मंत्रालयात प्रवेश करणे सोयीस्कर व्हावे याकरिता डीजी प्रवेश ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी झालेल्यांना डीजी ॲप प्रवेश कार्ड (आरएफआयडी) देण्यात येते. यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने तब्बल ८ हजार कार्ड बनवले. अभ्यागतांना दिलेले कार्ड बॉक्स मध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र ८ हजार कार्ड पैकी ३,५०० कार्ड अभ्यागतांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डीजी प्रवेश ॲप कार्ड जमा करा, अन्यथा यापुढे मंत्रालयात कायमस्वरूपी प्रवेश बंदी असेल, असा इशारा राज्य सरकारच्या गृह विभागाने दिला आहे.

कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणाली अंमलात आणली आहे. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असून फेस डिटेक्शनचे हजारो युजर्स आहेत. तर डीजी प्रवेश अॅपवर मोठ्या संख्येने नोंदणी होते.

फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्यांच्या वेळेत बचत होत असून रांगेत ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी केलेल्या अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश करताना कार्ड देण्यात येते. मंत्रालयातील आपले काम संपल्यावर कार्ड मंत्रालयातील गेटवर ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे. डीजी ॲपवर नोदणी करून मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना देण्यासाठी ८ हजार कार्ड बनवले असून एक कार्ड बनवण्यासाठी गृह विभागाला १०० रुपये मोजावे लागले आहेत. मात्र तपासणी केली असता ८ हजार कार्डपैकी ३, ५०० हजार कार्ड अभ्यागतांनी जमाच केले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

असे करा डीजी प्रवेश ॲप डाऊनलोड

'डिजी प्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईलच्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल.

अन्यथा पुन्हा मंत्रालयात प्रवेश नाही!

ज्या अभ्यागतांना कार्ड देण्यात आले आहे, ते कार्ड मंत्रालय सोडताना बॉक्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र कार्ड जमा न करताच अभ्यागत मंत्रालयाबाहेर पडताच त्यांना कार्ड जमा करा, असा मेसेज मोबाइलवर येतो. तरीही साडेतीन हजार आभ्यागतांनी कार्ड जमा केले नाही. सूचना करूनही दुर्लक्ष केले तर त्या अभ्यागतांना पुन्हा मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे अभ्यागतांनी कार्ड जमा करावे, असे आवाहन केल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी 'दैनिक नवशक्ति' शी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in