मुंबई : मुंबई विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीला वेळेत व्हीलचेअर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. एअर इंडिया विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईत आलेल्या ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीला विमान कंपनीकडून व्हीलचेअर न दिल्यामुळे त्यांना चालत जावे लागेल आणि यामुळे त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए)ला नोटीस बजावली असून एअर इंडिया प्रवाशाच्या मृत्यूचा अहवाल मागवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वत:साठी आणि पत्नीसाठी दोन व्हीलचेअरची विनंती केली होती. पण एअर इंडियाकडून फक्त एकच व्हीलचेअर देण्यात आली होती. यानंतर वृद्ध व्यक्तीला चालत जावे लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कारण टर्मिनलच्या आतील इमिग्रेशन काउंटरपर्यंत ते वृद्ध जवळपास १.५ किलोमीटर चालत गेले आणि ते इमिग्रेशन काउंटरपर्यंत चालत गेल्यानंतर तिथे कोसळले. यानंतर वृद्ध व्यक्तीला विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.एनएचआरसीने डीजीसीएला नोटीस बजावून चार आठवड्यात या घटनेचा तपशीलवर अहवाल मागवला आहे. यात मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलवावीत, अशी सूचना केली आहे.