
गेले दोन वर्षे कोरोनामुळे बाजारात मंदीचे वातावरण होते. आता सर्व निर्बंध उठल्याने दिवाळीचा उत्साह संपूर्ण देशात पसरला आहे. बाजारपेठा फुलल्या असून जागोजागी सेल, ऑफर, सवलती दिल्या जात आहेत. आज धनत्रयोदशीला सोने-चांदीची जोरदार खरेदी होणार आहे. देशभरात एकाच दिवसात २१ हजार कोटींची सोने खरेदीची उलाढाल होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
यंदाची दिवाळी ही अत्यंत उत्साही दिसत आहे. नवरात्र आणि दसऱ्याला यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.सध्या सोने आणि चांदीचे दर हे आकर्षक असल्याने या उत्साहात भर पडत आहे. सोने व चांदी खरेदीसाठी भारतात धनत्रयोदशी हा सर्वात मोठा दिवस असतो. यंदा ग्राहकांचा उत्साह बघता देशात २१ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय सराफी बाजारात होईल, अशी अपेक्षा आहे. तब्बल ४० ते ४२ टन सोने खरेदी होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
भारतात दिवाळीमध्ये कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल्स, दागिने इत्यादी ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या श्रेणीमध्ये सरासरी ३० अब्ज डॉलर्सची विक्री होते, ज्यामध्ये दागिन्यांचा वाटा हा ४ अब्ज डॉलर असतो. त्यामध्ये १.५ अब्ज डॉलर्सची विक्री ही एकट्या धनत्रयोदशीला होते.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घट होत असून, शनिवारी असणाऱ्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोने-चांदी स्वस्त झाले. दिल्लीत सोने ३७२ रुपयांनी घसरून त्याचा दर तोळ्यामागे ५०,१३९ रुपये झाला. गुरुवारच्या व्यवहारात सोन्याचा दर ५०,५११ रुपये होता, तर चांदीही ७९९ रुपयांनी स्वस्त होऊन ५६,०८९ रुपये प्रति किलोग्राम दर झाला.
सोन्या-चांदीच्या सर्चेसमध्ये ४० टक्के वाढ
धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या सर्चेसमध्ये ४० टक्के (वार्षिक पातळीवर) वाढ झाली असून, सणासुदीच्या निमित्ताने एकंदर मागणीत सोन्याचा वाटा ७० टक्के असल्याचे ‘जस्ट डायल’च्या ग्राहक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहकांमधील ट्रेंडविषयी ‘जस्ट डायल’चे सीएमओ प्रसून कुमार म्हणाले, दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये प्रेशियस मेटलला असलेली मागणी वाढली असून, पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये असलेल्या मागणीत ४४ टक्के वाढ झाली आहे. पहिल्या श्रेणीतील शहरांत सोन्या-चांदीच्या सर्चेसमध्ये ३४ टक्के वाढ झाली आहे. किमती स्थिर होत असतानाच सोन्याला सर्वाधिक मागणी असून, त्यात ३४ टक्के (वार्षिक) वाढ, चांदीमध्ये १४० टक्के, प्लॅटिनममध्ये ८२ टक्के वाढ झाली आहे, तर हिऱ्यांना असलेली मागणी स्थिर आहे.गेल्या दिवाळीच्या तुलनेत ३० टक्के वाढ अपेक्षित
यंदा ग्राहकांचा कल हा जड दागिन्यांकडे असल्याचे दिसून येत आहे. हलक्या वजनाचे दागिने हे विशेष करून भेट देण्यासाठी भाऊबीजेला घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी दागिने घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रि-बुकिंग झाले आहे. एकूणच गेल्या दिवाळीच्या तुलनेत आम्हाला ३० टक्के वाढ अपेक्षित आहे.
- डॉ. सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक