अदानी हटाव, धारावी बचाव

धारावी बचाव आंदोलक आक्रमक ; १२ ऑक्टोबरला मोर्चा
अदानी हटाव, धारावी बचाव

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानीची नियुक्ती करण्यात आली असून या विकासकावर भरोसा नाही, असे मत धारावीतील नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ‘अदानी हटाव, धारावी बचाव’ या मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) कार्यालयावर दुपारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

अदानी हा विश्वासार्ह विकासक नाही अशी जनभावना असल्याने, अदानीला हटवून अन्य सक्षम विकासकाची नेमणूक करा, म्हाडातर्फे पुनर्विकासाचे काम सुरू करा, निवासी झोपडीधारकांना ४०० चौरस फुटांचे घर तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींतील रहिवाशांना ७५० चौ. फुटांचे घर मोफत द्या, अनिवासी, औद्योगिक, व्यापारी वापराच्या गाळेधारकांना वापरात असलेल्या आकाराचे पुनर्वसन गाळे विनामूल्य द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

पात्र निवासी, अनिवासी झोपडीधारकांची यादी जाहीर करूनच प्रकल्पाची सुरूवात करा, प्रकल्पाचे प्रारूप नीट समजण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा जाहीर करा, विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून धारावीतील झोपडीधारकांना धारावीच्या बाहेर हुसकावून लावण्याचे धोरण हाणून पाडा, सर्व निवासी, अनिवासी झोपड्यांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा, अशी माहिती धारावी बचाव आंदोलनातर्फे देण्यात आली आहे. या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), आझाद समाज पार्टी, सर्व समाज जनता पार्टी, धारावी भाडेकरू महासंघ आणि धारावीतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in