मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. याच धारावीत सण, उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य तयार होते. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धारावीतील कुंभारवाड्यात नवरात्रोत्सवात विशेष महत्त्व असलेल्या गरबा-घटाच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. धारावीतील गरबा- घटाला देश-विदेशातून मोठी मागणी असून येथून हे गरबा-घट खरेदी करून व्यापारी ते परदेशात विक्रीसाठी पाठवतात.
गणेशोत्सव संपताच सर्वांना नवरात्र उत्सवाचे वेध लागतात. या उत्सवात मातीच्या घटाला विशेष महत्त्व असते. यंदाही धारावीत कुंभारवाड्यातील दुकानांमध्ये मातीचे घट विक्रीस आले आहेत. पारंपरिक घटाबरोबर आकर्षक रंगरंगोटी आणि सजावटीचे गरबा-घट विक्रीस ठेवण्यात आले आहेत. येथील कुंभारवाड्यात घट तयार करण्याची सुरुवात फेब्रुवारी -मार्च महिन्यापासून सुरू होते. तयार झालेले घट सुकवून, भट्टीमध्ये भाजून त्याला रंगरंगोटी करण्यात येते. यानंतर ते देश-विदेशात विक्रीसाठी पाठविण्यात येतात.
गुजरातमधील लोकांसाठी धारावीत विशिष्ट प्रकारचे गरबा (गर्भद्वीप) तयार करण्यात येतात, त्याची गुजराती लोकांकडून खरेदी केली जाते, तर अन्य राज्यांतील लोक घट खरेदी करतात. नवरात्रौत्सवासाठी धारावीत लाखोंच्या संख्येने घट तयार करण्यात येतात. हे घट मुंबईसह देशातील विविध भागात विक्रीस जातात. तसेच विदेशामध्येही या घटांना मागणी आहे. धारावीतील मोठमोठे व्यापारी विदेशात गरबा आणि घट पाठवतात. यामधून लाखो रुपयांची उलाढाल धारावीमध्ये होत असते. धारावीतील उत्पादक राज्यासह देशभरात होलसेल दरात घट, गरबा पाठवतात. यामुळे नवरात्र सुरू होण्याच्या काही दिवस आधीच धारावीतील संपूर्ण माल विकला जात असल्याची माहिती येथील उत्पादकांनी दिली.
घटांच्या किमती १५० रुपयांपासून सुरू
गरबा हा विविध आकार आणि डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. १५० रुपयांपासून गरबाच्या किमती सुरू होतात, तर जम्बो गरबा २,५०० रुपयांपर्यंत मिळतो. काळ्या रंगाचा घट ४० रुपयांपासून मिळतो. गुजरात आणि पुणे येथूनही मुंबईतील दुकानांमध्ये माल विक्रीस येतो, असे येथील विक्रेते कल्पेश टंक यांनी सांगितले.