

मुंबई : धारावीलगतच्या झोपडपट्टीला नुकतीच आग लागून हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, पुन्हा अशा प्रकारे आग लागू नये, यासाठी धारावीच्या पुनर्विकासात रस्त्याचे विस्तृत जाळे, आपत्ती प्रतिसाद क्षमता, हरित क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणांच्या सुधारणांवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे धारावी अधिकच सुरक्षित होणार आहे.
राज्य सरकारचा ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’चा संकल्प पुढे नेत असताना, माहीम स्थानकाजवळ नुकत्याच लागलेल्या आगीने हे उद्दिष्ट केवळ शहरी विकासाचा भाग नसून अत्यावश्यक सुरक्षा गरजेची असल्याचे प्रकर्षाने दाखवून दिले आहे. शनिवारी रात्री माहीम स्थानकाजवळ हार्बर रेल्वे मार्गालगत लागलेल्या आगीत धारावीतील अनेक झोपड्या आणि व्यावसायिक गाळे जळून खाक झाले होते. मुंबईच्या व्यस्त रेल्वे मार्गांच्या अगदी काही मीटर अंतरावर उभ्या असलेल्या अनियमित वस्त्यांमुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा भागांमध्ये लागणारी कोणतीही छोटी आगही मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेला ठप्प करू शकते आणि असंख्य जीव धोक्यात येऊ शकतात ही बाबही प्रकर्षाने पुढे आली आहे.
रहिवाशांनी व्यक्त केली चिंता
माहीम फाटक रोड परिसरातील रहिवासी श्याम राज मिश्रा यांनी सांगितले, “नवरंग कंपाउंडमधील एक मजली गाळ्यांपैकी एका गाळ्यातील पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाक खोलीतील सिलिंडरचा स्फोटामुळे ही आग लागली. ही जागा अत्यंत दाटीवाटीची आहे. व्यावसायिक गाळ्यांमध्ये असलेली ज्वलनशील सामग्री क्षणात पेटली आणि आग झपाट्याने पसरली.” धुराचे प्रमाण वाढताच रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड वीजपुरवठा तात्पुरता बंद केला, त्यामुळे लोकल सेवा थांबल्या.
अनेक प्रवाशांना रुळांवरून चालत पुढे जावे लागले आणि बरेच जण अडकून पडले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्या आणि प्रभावित झोपडपट्टीचा दैनंदिन जीवनक्रम कोलमडला. “सुदैवाने, जळालेल्या झोपड्यांचे अवशेष रेल्वे रुळांवर पडले नाहीत, नाही तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. धारावी पुनर्विकासात हे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे,” असे रहिवासी राजू दळवी म्हणाले.
सुरक्षा नियमांचे पालन
समोरील सर्वात मोठा धोका म्हणजे येथील अरुंद आणि गर्दीने भरलेले अंतर्गत रस्ते, जे आपत्कालीन बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण करतात. धारावीतील प्रत्येक भागात योग्य सुरक्षा निकषांसह प्रवेश सुनिश्चित केला जाणार आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी आवश्यक ती मानके आणि डीसीपीआरच्या तरतुदी काटेकोरपणे पाळल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुरक्षित बफर झोन
पश्चिम - हार्बर रेल्वे मार्गालगत संपूर्ण धारावीभोवती 20 मीटर रुंदीचा समांतर रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता पुनर्विकसित धारावीच्या पश्चिमेकडील हद्दी आणि रेल्वे मार्ग यांच्या दरम्यान सुरक्षित ‘बफर झोन’ म्हणून काम करणार आहे. “हा रस्ता आपत्तीवेळी हालचालीसाठी मदत करेल त्याचप्रमाणे, मध्य रेल्वे मार्गालगत सेक्टर-२ मध्ये हरित बफरचीही योजना करण्यात आली आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.