धारावीत झोपडपट्टीधारकांना मिळणार ३५० चौरस फुटाचे घर

आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास हा कायमच चर्चेचा विषय राहिला
धारावीत झोपडपट्टीधारकांना मिळणार ३५० चौरस फुटाचे घर

मुंबई : धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालय असलेले किमान ३५० स्क्वेअर फुटाचे घर मिळणार आहे, अशी घोषणा अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने सोमवारी केली. १ जानेवारी २००० सालाआधी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीवासीयांनाच धारावीत घरे मिळणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. धारावीतील घराचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १७ टक्के अधिक आहे.

सर्व धारावीकरांसाठी नवीन सदनिका या स्वप्नातील घरं असतील आणि त्यांचे राहणीमान उंचावतील. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीचा आत्मा अबाधित राखून ही स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल. तसेच हे फ्लॅट्स सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ते हवेशीर आणि आरोग्यदायी असतील.

आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. तब्बल ४५० एकर परिसरात पसरलेल्या या झोपडपट्टीच्या विकासाचे काम अदानी उद्योग समूहाला देण्यात आले आहे. अदानी उद्योग समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड’ (डीआरपीपीएल) ही संयुक्त उपक्रम म्हणून कंपनी स्थापन करण्यात आली आहे. धारावीकरांचे जीवनमान उंचावून, उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून देत धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा उद्देश कंपनीने या आधीच जाहीर केला आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या धारावीमध्ये नागरिकांसाठी उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली उपलब्ध करण्यात येणार आहे. सोबतच येथे सांस्कृतिक केंद्र, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्र उभारण्याची कंपनीची योजना आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेसाठी अदानी उद्योगसमूहाने ५०७० कोटी रुपयांची बोली लावली होती. त्याखालोखाल डीएलएफने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. दरम्यान, धारावी झोपडपट्टीत तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांनाच घरे देण्यात येणार आहे. पोटमजला तसेच वरील मजल्यांवरील रहिवाशांना घरे मिळणार नाहीत.

धारावीत अनेक लघुद्योग

धारावीत १३ हजारहून अधिक चामडे, मातीच्या वस्तू, टेक्स्टाईल, गारमेंट आणि शिलाईचे काम असे अनेक छोटे-मोठ्या प्रकारचे लघुद्योग येथे आहेत. धारावी झोपडपट्टी ही मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला जोडलेली आहे. धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तेरेच्या दिशेला मिठी नदी आहे. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास होत असताना येथील झोपड्यांचे पात्र व अपात्रतेचे निकष मात्र १ जानेवारी २००० सालापर्यंतचेच आहेत. त्यामुळे धारावीतील झोपडपट्ट्यांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी धारावीकर नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in