धारावीकरांना मिळाली ‘प्रतीकात्मक चावी’; सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाइनची संधी

बुधवारी सकाळी धारावीकरांना त्यांच्या दारात एक प्लास्टिक चावी आढळली आणि अनेकांना थोडा वेळ आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातीला गोंधळलेल्या रहिवाशांना नंतर समजले की ही एक आगळीवेगळी जनजागृती मोहीम आहे. जी ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’अंतर्गत (डीआरपी) राबवण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बुधवारी सकाळी धारावीकरांना त्यांच्या दारात एक प्लास्टिक चावी आढळली आणि अनेकांना थोडा वेळ आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातीला गोंधळलेल्या रहिवाशांना नंतर समजले की ही एक आगळीवेगळी जनजागृती मोहीम आहे. जी ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’अंतर्गत (डीआरपी) राबवण्यात आली आहे.

प्रतीकात्मक प्लास्टिकच्या चावीवर एक हेल्पलाईन क्रमांक छापलेला होता. ही केवळ एक वस्तू नव्हती, तर एक महत्त्वाचा संदेश देणारे माध्यम होते. ज्या रहिवाशांचे घराचे सर्वेक्षण काही कारणास्तव राहिले आहे, त्यांनी या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून सर्वेक्षण करवून घ्यावे किंवा इतर कोणत्याही शंकांचे निरसन करावे, असा हेतू या उपक्रमामागे होता.

सर्वेक्षण जवळपास संपत आले आहे. कुंभारवाडा, कंपाऊंड १३, काही खासगी जमिनीवरील घरे आणि इतर काही छोटे भाग वगळता, बहुसंख्य घरे सर्वेक्षणाच्या कक्षेत आली आहेत. आतापर्यंत ८६,००० हून अधिक घरांचा समावेश या पुनर्विकास योजनेत झाला आहे. मात्र, काहींचे सर्वेक्षण राहून गेले असल्यास त्यांनी आता हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, अशी सुविधा डीआरपीद्वारे देण्यात आली आहे, असे डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्लास्टिकच्या चावीवर छापलेल्या हेल्पलाईन क्रमांकामुळे रहिवाशांना हक्काच्या घरासाठी आपले नाव नोंदवण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. कोणताही रहिवासी मागे राहू नये, हा ‘घर सबके लिये’ या योजनेचा मूळ उद्देश आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. ही आमच्या स्वप्नाची चावी आहे, असे एका रहिवाशाने भावूक होत सांगितले. सुरुवातीला अफवा पसरल्या होत्या की ही प्लास्टिकची चावी नेमकी काय आहे, पण नंतर जेव्हा यामागील उद्देश समजला, तेव्हा दिलासा मिळाला, असे स्थानिक इडली विक्रेते नटेशन नाडर यांनी सांगितले.

सरकारने जनजागृतीसाठी हे अतिशय चांगले पाऊल उचलले आहे. आता ज्यांचे सर्वेक्षण काही कारणास्तव राहिले आहे, त्यांना सहज संपर्क करता येणार आहे.

फरीद खान नावाच्या दुसऱ्या रहिवाशानेही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. धारावी खूप मोठे क्षेत्र आहे. काही वेळा अनावधानाने काही घरे राहून जातात, किंवा रहिवासी घरी नसतात. अशा वेळी ही मोहीम उणीव भरून काढते आणि सर्वेक्षण अधिक अचूक आणि सर्वसमावेशक बनवते, असे ते म्हणाले.

हक्काच्या घराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

पुनर्विकास मोहिमेचा वेग वाढत असताना ही प्रतीकात्मक चावी आता केवळ प्लास्टिकचा तुकडा राहिलेली नाही. ती आशेचे प्रतीक बनली आहे. एक महत्त्वपूर्ण दुवा आहे जी हजारो लोकांसाठी त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.

logo
marathi.freepressjournal.in