मुंबई : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ बुधवारी सायंकाळी धारावी पुनर्विकास संघाच्या वतीने शक्ती विनायक मंदिर येथील ९० फुटी रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी पेढे वाटप करून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि काम जलद गतीने व्हावे यासाठी घोषणाबाजी देखील दिली.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी धारावीतील विविध विभागांमध्ये सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे या प्रकल्पाच्या विरोधात काही मोजक्या आंदोलकांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले. मात्र या आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश आंदोलक हे बाहेरील असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच धारावी मधील मूळ नागरिक या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. यामुळे आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी या आंदोलनात हे सहभागी झाले असल्याचे मतही काही नागरिकांनी व्यक्त केले.
"धारावीचा पुनर्विकास झाल्यास येथील नागरिकांना हक्काची पक्की घरे उपलब्ध होतील. यामुळे धारावीवासियांचा पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा आहे. मात्र काही जण खोटे आंदोलन करून हा प्रकल्प थांबवू इच्छित आहेत. त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी.
- राजीव कुमार चौबे, धारावी पुनर्विकास संघ