आशासेविकांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे
आशासेविकांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

मुंबई : देशातील सर्व क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, खासगी, संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांना किमान एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस किंवा सानुग्रह अनुदान दिवाळीला दिले जाते. परंतु गटप्रवर्तक व आशासेविकांना मात्र सानुग्रह अनुदानाच्या बाबतीत मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आशासेविका आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.

राज्यात ७० हजार आशा कर्मचारी आणि ४०० गट प्रवर्तक कार्यरत आहेत. आशासेविका योजनांची माहिती, माहितीचे अर्ज, आरोग्य सुविधांबाबत जनजागृतीसह त्याचे अर्ज भरणे अशी नानाविध कामे करतात. यात नवीन गरोदर माता शोधणे, लसीकरण न झालेली मुले शोधणे, नव्याने राहायला आलेली माता शोधणे, सांसर्गिक आजाराचे रुग शोधणे, अंगणवाडी सेविकांना हाताशी घेऊन त्यांच्या मदतीने साथीच्या आजाराबाबत जनजागृती करणे, आभा कार्ड काढणे, अशी अनेक कामे आशा सेविकांकडून करण्यात येतात. मात्र तरीही त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे म्हणावे तसे लक्ष नसते. सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

सानुग्रह आंदोलनाच्या मुख्य मागणीसह आशा सेविकांना दरवर्षी पाच हजार रुपये साधील खर्च, भर पगारी प्रसूती रजा, महिन्याच्या पहिल्या तारखेला मानधन, मात्र वाढत्या महागाईच्या प्रमाणात मोबदल्यात वाढ करावी, तसेच स्मार्टफोन आणि मराठी भाषेत अॅप द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गतप्रवर्तक व आशासेविका संघ आझाद मैदानात मंगळवारी धरणे आंदोलन करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in