

मुंबई : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलने (डीएआयएस) आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एज्युकेशन अॅडव्हायझर्स यूके यांनी २०२६ च्या आंतरराष्ट्रीय पदविका कार्यक्रमाच्या (आयबीडीपी) निकालांच्या आधारे जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत शाळेने नववे स्थान पटकावले आहे. जागतिक स्तरावरील पहिल्या दहा शाळांमध्ये स्थान मिळवणारी 'डीएआयएस' ही भारतातील एकमेव शाळा ठरली आहे.
आतापर्यंतची सर्वोच्च सरासरी
शाळेच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असून जागतिक स्तरावर भारतीय आंतरराष्ट्रीय शिक्षणाची ताकद अधोरेखित झाली आहे. डीएआयएसच्या २०२६ च्या विद्यार्थ्यांच्या तुकडीने सरासरी ४०.८ गुण मिळवले असून शाळेच्या इतिहासातील ही सर्वोच्च सरासरी आहे.
या तुकडीत एकूण १०५ विद्यार्थी होते. जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा शाळांमध्ये पदवीपूर्व आयबीडीपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या डीएआयएसमध्ये होती.
सामूहिक, वैयक्तिक स्तरावरही उल्लेखनीय यश
मोठ्या विद्यार्थीसमूहालाही सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट शैक्षणिक यश मिळवून देण्याची शाळेची क्षमता या कामगिरीतून दिसून येते. या विद्यार्थ्यांच्या तुकडीने वैयक्तिक स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन केले. एकूण १३ विद्यार्थ्यांनी आयबी डिप्लोमा परीक्षेत ४५ पैकी पूर्ण ४५ गुण मिळवले तसेच या तुकडीतील जवळपास एकतृतीयांश विद्यार्थी जगभरातील सर्वोच्च एक टक्का विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. यावरून संपूर्ण विद्यार्थीसमूहाची शैक्षणिक गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित होते.
डीएआयएसमध्ये आमचा विश्वास आहे की, शिक्षण हे केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता, चारित्र्य आणि जगाप्रती जबाबदारीची भावना विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा गौरव आमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचा व पालकांच्या पाठिंब्याचा व प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे फलित आहे.
ईशा अंबानी, उपाध्यक्षा, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल