कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीत अडचण?

पुलांच्या खाली असणारे अतिक्रमण तसेच व्यावसायिक गाळे यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.
कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीत अडचण?
Published on

मुंबईतील महापालिकेच्या पूल विभागाने जुन्या पुलांची स्थिती पाहून, मुंबईतील ब्रिटिशकालीन पुलांची पुनर्बांधणी केली जात आहे. सध्या कर्नाक बंदर आणि भायखळा पुलांची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. मात्र या पुलांच्या खाली असणारे अतिक्रमण तसेच व्यावसायिक गाळे यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील माझगाव व डोंगरी यांना जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन हॅकॉक पूलाप्रमाणे अडचणींना पूल विभागाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने या कामामध्ये दिरंगाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रत्यक्ष बांधकाम करण्यास उशीर

मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांना लागून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. त्यात व्यावसायिक गाळ्यांचे प्रमाण देखील मोठे आहे. हे अतिक्रमण काढून त्यानंतर बांधकामाला सुरुवात करावी लागण्याची शक्यता आहे. अतिक्रमण हटवणे हे अतिक्रमण विभागाचे काम असून त्यानंतर पुनर्वसन करण्याचे काम इमारत विभागाकडून केले जाते. या विभागाची कामे पूर्ण होईपर्यंत पुलनकच्या बांधकामाचे काम सुरू करणे शक्य होत नाही. इतकेच नाही तर अनेक जुने पूल दाटीवाटीच्या ठिकाणी असून तेथे काम करण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे नियोजन तयार आहे; मात्र प्रत्यक्ष बांधकाम करण्यास उशीर होत असल्याची माहिती पूल विभागाचे उप मुख्य अभियंता संजय इंगळे यांनी दिली.

पुलाशेजारी अनाधिकृत बांधकामे

भायखळा येथील मध्य रेल्वेवरील १२५ वर्ष जुना पूल देखील धोकादायक झाला आहे. त्यामुळे हा पूल पडण्यापूर्वी नवा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात बांधकामे असल्याने पुलाचे पिलर उभारायला ही जागा नाही. त्यामुळे या पुलाचे काम 'केबल स्टे'चे तंत्रज्ञान वापरून केला जाणार आहे. मात्र ही पुलाच्या नवीन बांधकामासाठी अतिक्रमित बांधकामांची मोठी अडचण भासत आहे. या पुलाखाली देखील काही बांधकामे आहेत. या बांधकामांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यानंतरच बांधकामाला सुरुवात होईल.

logo
marathi.freepressjournal.in