पावसाळ्यात होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यास चार महिने सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी संबधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत खोदकाम करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही चहल यांनी स्पष्ट केले.
मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून ५ हजारांहून अधिक कामे सुरू आहेत. महापालिकेच्या सहा हजार कोटींची रस्ते कामे सुरू आहेत. मात्र यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पावसाळ्यात रस्ते अपघात टाळण्यासाठी १५ मेपासून रस्त्यांवर खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात १५ मेपासून रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशा सूचना चहल यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.