ईडी चौकशीप्रकरणी दिलीप ढोलेंचे हात वर!

नव्याने समन्स बजावले जाणार
ईडी चौकशीप्रकरणी दिलीप ढोलेंचे हात वर!

मुंबई : जमीन घोटाळ्याप्रकरणी मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप ढोले यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपयांच्या या जमीन घोटाळ्याची ईडी मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे. ढोले यांना यापूर्वीही समन्स बजावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीचे हे समन्स महापालिका आयुक्तांच्या नावे आहे. आपल्याला व्यक्तिगतरीत्या हे समन्स बजावण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करत मीरा-भाईंदर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त संजय काटकर त्याला उत्तर देतील, अशी भूमिका ढोले यांनी मांडली.

दैनिक 'नवशक्ति'ने दिलीप ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर अधिक तपशीलवार बोलण्यास नकार दिला. आपल्याला कोणतेही समन्स मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ईडीला आवश्यक असलेल्या फाइल्स मीरा-भाईंदर महापालिकेच्या नवीन आयुक्तांकडून त्यांना मिळू शकतात. नवनियुक्त आयुक्त संजय काटकर ईडीच्या प्रश्नांना देतील, असेही ढोले यांनी स्पष्ट केले.

ईडीचे हे समन्स नागरी जमीन कमाल मर्यादा प्रकरणाच्या संदर्भात मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त म्हणून आपल्याला आले होते. ईडीने या प्रकरणाशी संबंधित काही फाइल मागवल्या होत्या. आता त्या पदावर आपण नसल्यामुळे सध्याचे आयुक्त समन्सला सामोरे जातील, असे दिलीप ढोले म्हणाले. समन्स बजावल्याननंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विचारले असता बदली हा राज्य सरकारने घेतलेला प्रशासकीय निर्णय आहे. यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असे ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, ईडी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना नव्याने समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याची सूचना केली जाणार आहे.

१५० कोटींच्या मालमत्तेची तक्रार

गेल्या वर्षी दिलीप ढोले यांच्याविरोधात त्यांचेच एक नातेवाईक भगवान चौधरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या पुणे युनिटकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे. ढोले यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत कोट्यवधींची मालमत्ता कमावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या सहा वर्षांत ढोले आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी १५० कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यात पुण्यातील इंदापूर तालुक्यातील जमिनी तसेच खारघरमधील एम्पायर अपार्टमेंट्समधील अनेक फ्लॅट्सचाही उल्लेख आहे.

ढोलेंकडून इन्कार

तक्रारीत नमूद केलेल्या मालमत्तेची नोंदणी आपल्या नावावर नसल्याचे दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबातील ज्या नातेवाईकांच्या नावांचा तक्रारीत उल्लेख आहे त्यांच्या व्यवहाराशी आपला काहीही संबंध नाही. त्यांचे उत्पन्नाचे स्वतंत्र स्रोत आहेत. त्यातून त्यांनी मालमत्ता घेतल्या आहेत. २००५ पासून आपण क्वचितच मूळ गावी गेले आहोत, असेही ढोले यांनी सांगितले. आपली पत्नी सुजाता ढोले या एक सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्याकडे वारसाहक्काने मिळालेल्या काही जमिनी आहेत. तक्रारदार हा आपला दूरचा नातेवाईक आहे. त्याने मीरा रोड येथे आपल्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार देखील केली होती, असे ढोले यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in