मुंबई : शरद पवार यांना एकदाही स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, अशा शब्दांत पवारांचे पटशिष्य आणि आता बंडखोर गटात असलेले दिलीप वळसे पाटील यांनी पवारांच्या मर्यादांवर बोट ठेवले. वळसे पाटील यांच्या या विधानाने सोमवारी राज्यात गदारोळ माजला. युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. तर अजित पवार गट वळसे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
कालच्या वक्तव्यावर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट केले आहे. ‘‘माझ्या भाषणात मी कुठेही शरद पवार यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही, एवढा मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडले नाही, त्याबद्दलची मी खंत बोलून दाखवली. ही खंत केवळ कालच नव्हे तर यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे, असे वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या विरोधात अवमानजनक विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही किंवा राज्यात कधीच स्वबळावर सत्ता आणता आली नाही, असे विधान केले होते. त्यावरून आता गदारोळ निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्याबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे, त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते आणि जनतेसमोर मांडले होते, त्याचा प्रसारमाध्यमांनी अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला, असेही वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील वळसे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. आधी स्वत:चा पक्ष स्थापन करा आणि दोन राज्यात सत्ता स्थापन करून दाखवा, असे आव्हान आव्हाड यांनी दिले आहे. शरद पवार यांनी निर्माण केलेला पक्ष चोरून न्यायचा प्रयत्न का करताय, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. या विधानाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नीलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
अजितदादा गट वळसेंच्या पाठीशी
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट मात्र वळसे-पाटील यांच्यासोबत ठाम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशाच आशयाचे भाषण पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात केले होते. त्याबाबतचे ट्विट पक्षाने केले आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या बळावर पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणली. अरविंद केजरीवालांनी दोन राज्यांत सत्ता स्थापन केली. नितीश कुमारांनी बिहारमध्ये वर्चस्व स्थापन केलं आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी स्वबळावर सत्ता आणली. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांनी एकहाती सत्ता स्थापन केली. मात्र, या सर्वांमध्ये शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ वर्षांच्या इतिहासात पक्षाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही, असे अजित पवार या भाषणात म्हणाले होते.