Mumbai : दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी प्रवास सुसाट; १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार

गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान ३ बाय ३ मार्गिकेच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
Mumbai : दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी प्रवास सुसाट; १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार
(Photo - X)
Published on: 

मुंबई : गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान ३ बाय ३ मार्गिकेच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान १.२६ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दिंडोशी न्यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे उड्डाणपूल वळून दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. या पुलाचे बांधकाम एक स्तंभावर पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटचे सेगमेंटल बॉक्स गर्डर वापरून करण्यात आले आहे. या पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले असून १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी पाहणी केली.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५

मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल. तसेच, इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही सुधारणा होईल. एकूणच, मुंबईतील नागरिकांचे राहणीमान सुधारण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचा उड्डाणपूल एकूण ३१ खांबांची उभारणी, एकूण ३० स्पॅन आदींचा समावेश आहे. खांबांवर तुळई बसविणे, डेक स्लॅबचे ओतकाम तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच मार्गांचे कामही पूर्ण झाले आहे.

भूमिगत बोगदा खोदकामाला वेग

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीनद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी 'तुळशी' हे पहिले बोगदा खणन संयंत्र १७ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत बोगद्याचे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in