
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यासाठी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड रविवारी जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, तर इंग्लंडविरुद्धच्या पुनर्नियोजित कसोटी सामन्यासाठी १७ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-२० संघात दिनेश कार्तिक आणि उमरान मलिक यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, चेतेश्वर पुजाराचे काऊंटी क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएलचे यंदाचे पर्व शेवटच्या टप्प्यात असून येत्या २९ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यांचे वेध लागलेले असतानाच दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर झाले.