

पूनम आपराज/मुंबई
कथित ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी हजर झाला. दुपारी १ च्या सुमारास ईओडब्ल्यूच्या कार्यालयात पोहोचलेल्या डिनो मोरियाची ६ तास कसून चौकशी करण्यात आली.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला असून गरज भासल्यास त्याला पुन्हा समन्स बजावले जाऊ शकते. ‘आम्हाला मोरियाने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत त्याची चौकशी करायची होती. आजच्या चौकशीदरम्यान या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते,’ असे ईओडब्ल्यूच्या सूत्राने सांगितले. यापूर्वी गेल्या वर्षी ईओडब्ल्यूने डिनो मोरियाची या प्रकरणी दोनदा चौकशी केली होती.