मुंबई : प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. पालिकेच्या रस्ते विभागाकडून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची विविध ठिकाणी कामे सुरू असून या ठिकाणी धुळीचे कण हवेत पसरल्यास संबंधित विभाग अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. यात दंडात्मक कारवाई अथवा कठोर कारवाई करण्यात येणार आहे. धूळमुक्त मुंबईसाठी रस्ते विभागाने तातडीने नवीन नियमावली तयार करावी, असे निर्देश रस्ते विभागाला दिले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा प्रदूषण वाढल्याने मुंबई हायकोर्टाने पालिकेची कानउघडणी केल्यानंतर पालिका लागलीच अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
ऑक्टोबर २०२३ नंतर मुंबईत पुन्हा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. त्यात गेल्या काही महिन्यांपासून हवेची गुणवत्ता दर्शवणाऱ्या ‘एअर क्वालिटी निर्देशांका'त (एक्यूआय) कमालीची वाढ झाल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. त्यानंतर पालिकेने २५ ऑक्टोबर रोजी प्रदूषणकारी ठिकाणी २७ प्रकारची नियमावली जाहीर करत मुंबईत ६ हजारांवर बांधकामांना अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. यामुळे दिवसांत मुंबईतील ‘एक्यूआय’ १०० पर्यंत नियंत्रणात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र काही विभागात पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई व परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांत बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, मुंबई हार्बर, ट्रान्स हार्बर अशा प्रकल्पांत प्रदूषण नियंत्रण नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे, ‘नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणारे हे प्रकल्प बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. आता या पार्श्वभूमीवर पालिकेकडून आगामी काळात मोठ्या प्रमाणात सुरू होणाऱ्या रस्ते कामांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात येणार आहे.
अशी होणार कारवाई
पालिकेच्या रस्ते विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना प्रदूषण नियंत्रणासाठी घ्यावी लागणाऱ्या नियमांची, कार्यपद्धती माहिती नसते. त्यामुळे पर्यावरण विभागाकडून रस्ते विभाग प्रमुखासह डेप्युटी, सबइंजिनिअर्सनाही बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे.
या सर्वांना रस्तेकाम करताना होणाऱ्या प्रदूषणाची माहिती दिली जाईल. शिवाय हे प्रदूषण टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली जाईल. याच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित कंत्राटदारांना आदेश देण्यात येतील.
कंत्राटदारांकडून नियमावलीची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्यासाठी तपासणी करण्यासाठी कर्मचार्यांची टीम काम करेल. नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास लाखो रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई होईल.
रस्ते कामांत पाण्याचा फवारा
सिमेंट काँक्रिट मटेरियल बनवताना सिमेंट हवेत उडणार नाही, याची काळजी घेणे, खड्डा खोदताना-भरताना पाणी मारणे, काँक्रिट रोडवर चीर पाडताना ब्लेडवर पाणी मारणे, शक्य असल्यास सक्शन मशीनचा वापर करणे याशिवाय ड्रिलिंग-ग्राइंडिंग करताना पाण्याचा फवारा निरंतर सुरू राहील, अशा मशीनचा वापर कपणे अशी नियमावली येण्याची शक्यता आहे.