आता दादर स्टेशनहून सिद्धिविनायक मंदिरात जाण्याचे 'नो टेन्शन', दर ५ मिनिटांनी मिळणार 'ही' सेवा

श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होणार आहे.
आता दादर स्टेशनहून सिद्धिविनायक मंदिरात जाण्याचे 'नो टेन्शन', दर ५ मिनिटांनी मिळणार 'ही' सेवा

मुंबई : दादर पश्चिम ते प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरापर्यंत आता थेट बेस्ट बससेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे दर पाच मिनिटांनी वातानुकूलित मिनी बस भक्तांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात पूजा साहित्य विक्रेत्यांचे कै. काकासाहेब गाडगीळ मार्गावर स्थलांतर करण्याचे प्रस्तावित आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर व पालिकेच्या वतीने उपायुक्त (परिमंडळ-२) यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराभोवती (रावबहादूर सी. के. बोले मार्गावर) सद्यस्थितीत पूजा साहित्य विक्रेत्यांमुळे प्रवेशद्वाराजवळ दररोज गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांचे कै. काकासाहेब गाडगीळ मार्गावर स्थलांतर करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे.

मंदिराच्या दोन्ही मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारणे, अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करणे, दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था, ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता छत, मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण, भाविकांसाठी वाहनतळ, मंदिराच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना, मंदिराजवळील नवीन मेट्रो स्थानकापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वाढीव सुविधा तयार करणे, दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते श्री सिद्धिविनायक मंदिरादरम्यान प्रत्येक ५ मिनिटानंतर ‘बेस्ट’तर्फे मिनी बस चालविणे आदी कामांचा या विशेष प्रकल्पात समावेश आहे.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना उच्चतम दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेमार्फत ‘स्वारस्याची अभिव्यक्ती’ मागवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, वास्तुशास्त्रज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in