शिवसेना मतदारांकडून घेतली मतदानाची थेट रंगीत तालीम

मतदान करताना कोणत्या चुका टाळाव्यात, याचंही प्रशिक्षण दिलं गेलं
शिवसेना मतदारांकडून घेतली मतदानाची थेट रंगीत तालीम
Published on

दूध पोळले की ताकही फुंकून पितात, या म्हणीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना सावध झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरले होते. त्यामुळे शिवसेनेला एक मत कमी मिळाले होते. याची पुनरावृत्ती विधानपरिषद निवडणुकीत होऊ नये, म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांची शनिवारी मतदानाची थेट रंगीत तालीमच घेतली. यासाठी डमी मतपेटी ठेवण्यात आली होती. यावेळी सर्व आमदारांना प्रत्यक्ष मतदान कसं करावं, याचं प्रात्याक्षिक दाखवलं गेलं. मतदान करताना कोणत्या चुका टाळाव्यात, याचंही प्रशिक्षण दिलं गेलं.

सोमवार, २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. ११ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांची पवईच्या वेस्ट इन हॉटेलवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या दरम्यान या सर्व आमदारांची शनिवारी वेस्ट इन हॉटेलवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदारदेखील उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत आमदारांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान कसं करावं याचं प्रत्यक्षिक दाखवलं गेलं. प्रत्यक्ष मतदानावेळी जशी मतदान प्रक्रिया असते तसी रंगीत तालीम करणारं प्रत्यक्षिक सर्व आमदारांकडून करून घेण्यात आलं.

या बैठकीला प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या रंगीत तालमीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘‘मतदान कसं करावं, याची तपासणी होती. प्रत्येकाला मत टाकायला लावलं. मोजणी सुरु केली. कुणाचं मत चुकलं, काय चुकलं ते तपासलं गेलं. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत वाया गेलं. त्यासाठीच आता काळजी घेतली जात आहे. एक चुकलं म्हणून अजून कुणी जास्त चुकू नये. यासाठी सर्व काही सुरु आहे,’’ असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in