राज्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात, ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१.८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली
राज्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात, ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार

पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून, आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१.८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून, सद्य:स्थितीत पूर परिस्थिती नाही; मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटावर ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय राजापूर, कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १४.० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. चंद्रपूर शहरातील पाणी ओसरत आहे. इराई धरणातील विसर्ग कमी केला आहे.

बल्लारपूर- राजुरा रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनास विनंती केल्याप्रमाणे त्यांनी या दरम्यानच्या स्थानकांवर थांबा दिला आहे. त्यामुळे नारिकांना सुविधा झाली आहे व आष्टी-गोंडपिपरी दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बंद आहे. आतापर्यंत नदीकाठच्या ९९४ लोकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in