मुंबर्इ : टाटा उद्योग समुहातील घटक असलेल्या स्टारबक्स या प्रतिष्ठित साखळी रेस्टॉरंटमध्ये एका कर्मचाऱ्याने कामावरुन काढून टाकण्यात आल्याचा बदला घेण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. कामावरुन काढून टाकल्याचा राग उतरवण्यासाठी त्याने कंपनीशी संबंधित काही तपशील व कॉफी तयार करण्याची गुप्त रेसिपी जगजाहीर केली आहे. यामुळे स्टारबक्स व्यवस्थापनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
स्टारबक्स ही मूळ अमेरिकन रेस्टॉरंटची साखळी असून त्यांची टाटा सोबत समान भागीदारी आहे. ‘स्टारबक्स’ कॉफीसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या एम कफ कॉफीची किंमत सुमारे ३०० रुपयांपर्यंत असते. तरी देखील या कॉफीच्या चाहत्यांची देशात कमतरता नाही. स्टारबक्सच्या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच गर्दी असते आणि कॉफीसाठी रांग लावावी लागते. तर अशा स्टारबक्स कंपनीने कामावरुन काढून टाकल्याने कंपनीला धडा शिकवण्यासाठी या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर विविध कॉफीच्या सिक्रेट रेसिपी उघड केल्या.
स्टारबक्स कॉफीची रेसिपी पाहून अनेक नेटकऱ्यांनाही खूप आनंद झाला. ही कॉफी विकत घेण्यासाठी इतके पैसे देण्याऐवजी आता ती घरी बनवता येईल म्हणून अनेकजण खूश झाले. कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एकाच वेळी अनेक रेसिपींचे फोटो पोस्ट केले, ज्यामध्ये कॉफीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टारबक्स कॉफी बनवण्याची रेसिपी दिल्या आहेत. याआधीही स्टारबक्स कॉफीच्या रेसिपी लीक झाल्या आहेत. पण, नोकरीवरून काढून टाकल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याने कॉफीच्या रेसिपी लीक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.