मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ

Maharashtra assembly elections 2024 : मुंबईत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेने प्रयत्नांची पराकाष्टा करूनही विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुधवार २० नोव्हेंबरला केवळ ५१.४१ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४९.६० टक्के, तर उपनगरात ५१.७६ टक्के मतदान झाले होते. मुंबईतील मतदान बव्हंशी शांततेत आणि वेगाने तसेच सुव्यवस्थितपणे पार पडले.
मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ
Published on

मुंबई : मुंबईत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेने प्रयत्नांची पराकाष्टा करूनही विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुधवार २० नोव्हेंबरला केवळ ५१.४१ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४९.६० टक्के, तर उपनगरात ५१.७६ टक्के मतदान झाले होते. मुंबईतील मतदान बव्हंशी शांततेत आणि वेगाने तसेच सुव्यवस्थितपणे पार पडले.

सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत शहराच्या तुलनेत उपनगरात मतदारांचा अधिक उत्साह दिसून आला. निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरात भांडुपमध्ये सर्वाधिक म्हणजे ६०.१८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर तसेच मनसेचे शिरीष सावंत यांच्यात लढत आहे. त्याखालोखाल घाटकोपर-पश्चिममध्ये ५६.३६ टक्के, तर बोरिवलीमध्ये ५६.५ टक्के मतदान झाले होते. घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे राम कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय भालेराव तसेच मनसेचे गणेश चुक्कल यांच्यात संघर्ष आहे. बोरिवलीमध्ये भाजपचे संजय उपाध्याय आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय भोसले यांच्यात लढत आहे. शहर विभागात सर्वाधिक ५५.२३ टक्के माहिममध्ये तर, वडाळ्यात ५२.६२ टक्के मतदान झाले. शहरात कुलाबा मतदारसंघात सर्वात कमी ४१.६४ टक्के मतदान नोंदले गेले होते. माहिममध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर तसेच ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यात लक्षवेधी लढत आहे. उपनगरात सर्वात कमी मतदान चांदिवलीत ४७.०५ टक्के झाले. येथे शिवसेना शिंदे गटाचे दिलीप मामा लांडे आणि

काँग्रेसचे नसीम खान तसेच मनसेचे महेंद्र भानुशाली यांच्यात लढत आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत वरळीत ३.१८ टक्के, धारावीत ४.७१ टक्के, तर माहिममध्ये ८.१४ मतदान झाले होते. हा वेग हळूहळू वाढत गेला. अनेक जण सहकुटुंब मतदानाला आले होते. मतदान केंद्रात गेल्यावर सुमारे पाच ते १० मिनिटांतच मतदार मतदान करून बाहेर पडत होते. कुठेही लांबच लांब रांगांमध्ये ताटकळत उभे असलेले मतदार दिसले नाहीत. त्याचप्रमाणे अपवाद वगळता निवडणुकीच्या व्यवस्थेबाबत तक्रारीची सूर दिसून आला नाही. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह तसेच आसन व्यवस्था होती. दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वयंसेवक मदत करीत होते. दुपारी ११ वाजेपर्यंत विविध ठिकाणी १२ ते १९ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रमाण १९ ते ३३ टक्क्यांवर गेले. दुपारी ३ वाजेपर्यंत हा आकडा ३३ ते ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात मतदानाची टक्केवारी ४१.६४ ते ५२.६२ टक्क्यांवर गेली होती.

मुंबई उपनगरचा विचार केला असता सकाळी ९ वाजेपर्यंत मुलुंडमध्ये १०.७१ टक्के, भांडूपमध्ये १०.५९ टक्के, अंधेरी पूर्वमध्ये ९.०७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत दहिसरमध्ये २१.४९ टक्के, भांडूपमध्ये २३.४२ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत भांडूपमध्ये ४८.८२ टक्के, तर मानखुर्द शिवाजीनगरमध्ये ३६.४२ टक्के मतदान झाले.

दिव्यांगांसाठी खास वाहने

मतदान केंद्रांच्या बाहेर दिव्यांग मतदारांना आणण्यासाठी ठेवलेली खास वाहने, टॅक्सी दिसत होत्या. अशाच एका व्हॅनचे चालक अब्दुल समद यांनी सांगितले की, त्यांनी दिवसभरात मुंबादेवी, काळबादेवी, फणसवाडी आदी ठिकाणांहून दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचवले आहे. या वाहन व्यवस्थेच्या समन्वयकाकडून त्यांना मोबाईलवरून गरजेनुसार बोलावले जात होते. दिव्यांग मतदारांचे व्हिल चेअर उलण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. याचप्रकारे कुलाबा- माजगाव दरम्यान दिव्यांगांसाठी टॅक्सी सेवा दिलेल्या मोहम्मद अक्रम खान यांनी सांगितले की, सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांचे काम सुरू झाले होते.

मतदान केंद्राच्या आवारात सेल्फी पॉईंट

मुंबईतील मतदान केंद्रांच्या बाहेर मोबाईल आत नेण्यास काही ठिकाणी बंदी असल्याचे फलक ठळकपणे लावण्यात आले होते. अशा वेळी कुटुंबातील एखादा सदस्य केंद्राबाहेर उभा राहून अन्य लोक मतदानासाठी आत जात होते. मतदान केंद्राच्या आवारात सेल्फी पॉईंट उभारले होते. पण निर्बंधांमुळे तेथे फारसे कोणी सेल्फी घेताना दिसले नाहीत. केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर मात्र तरुण-तरुणींचा उत्साह दिसून येत होता. दक्षिण मुंबईतील जे जे कला महाविद्यालयातील मतदान केंद्राबाहेर सुब्रिता या तरुणीने सांगितले की, ती तिच्या आजीसह मतदानाला आली आहे. मतदान केंद्रावर उत्तम व्यवस्था असल्याचे तिने सांगितले. नितीन मोरे यांचे संपूर्ण कुटुंब मतदानासाठी आले होते. या वेळी मतदानाची व्यवस्था चांगली आहे, कुठेही ताटकळत राहावे लागले नाही, असे ते म्हणाले.

उमेदवारांची धाकधूक वाढली

यंदा मुंबईतील मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सुट्टीच्या किंवा जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत मतदान घेतल्यास मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने आयोगाने सुट्टीव्यतिरिक्त दिवस निवडला होता. त्यानुसार बुधवारी राज्यात एका टप्प्यात मतदान घेण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरात मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र पहिल्या दोन तासांत खूप कमी मतदान झाले. वांद्रे पूर्व, मागाठाणे, अनुशक्ती नगर, चेंबूर, कुर्ला या मतदारसंघांमध्ये सुरुवातीच्या दोन तासांत केवळ ५ ते ६ टक्के मतदान झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in