पीक उत्पादन वाढवणाऱ्या जीवाणूंचा शोध; आयआयटी मुंबईच्या संशोधकांना यश

मातीतील विषारी प्रदूषक खाऊन त्यांना उपयुक्त पोषकद्रव्यांमध्ये परिवर्तित करणाऱ्या जीवाणूंचा शोध भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या संशोधकांनी लावला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मातीतील विषारी प्रदूषक खाऊन त्यांना उपयुक्त पोषकद्रव्यांमध्ये परिवर्तित करणाऱ्या जीवाणूंचा शोध भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या संशोधकांनी लावला आहे. या संशोधनामुळे मातीतील प्रदूषण कमी करून पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यात मदत होणार आहे.

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, संशोधकांनी नैसर्गिक संसाधनांवरील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विषारी रसायने व प्रदूषकांवर पोषण करणाऱ्या जीवाणूंवर अभ्यास केला आहे. 'एन्व्हार्नमेंटल टेक्नाॅलाॅजिज अँड इन्होव्हेशन' या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, विशिष्ट जीवाणू प्रजातींचा वापर करून मातीतील सेंद्रिय प्रदूषक काढून टाकण्याची पद्धत मांडली आहे.

हे जीवाणू पिकांच्या वाढीचे हार्मोन्स वाढवण्यात, हानिकारक बुरशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यात, तसेच वनस्पतींसाठी आवश्यक पोषकद्रव्ये सहज उपलब्ध करून देण्यात उपयुक्त असल्याचे आढळले आहे. पदार्थांचे जटिल स्वरूप, जसे की कीटकनाशकांमुळे मातीतील सेंद्रिय प्रदूषकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे बियांची उगमक्षमता कमी होते, पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि मातीतील प्रदूषक वनस्पतींच्या बियाणे व जैवभारामध्ये जमा होतात.

पारंपरिक उपाय - जसे की रासायनिक प्रक्रिया किंवा माती हटवणे, हे महागडे असून समस्या पूर्णपणे सोडवण्यात कमी पडतात. या समस्येवर उपाय म्हणून IIT बॉम्बेच्या संशोधकांनी विषारी वातावरणातून जीवाणू वेगळे केले.

वनस्पतींच्या आरोग्यासाठी फायदेशीर

जीवाणूंमुळे फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखी आवश्यक पोषकद्रव्ये विद्राव्य स्वरूपात परिवर्तित होऊन वनस्पतींसाठी सहज उपलब्ध होतात. ते सिडेरोफोर्स नावाचे पदार्थ तयार करतात, जे पोषण-पुरवठा मर्यादित परिस्थितीत वनस्पतींना लोह शोषून घेण्यास मदत करतात.

पिकांचे उत्पादन वाढवण्यात प्रभावी

सेडोमोनस आणि एसिनटोबॅक्टरच्या मिश्रणामुळे गहू, मूग, पालक, मेथी यांसारख्या पिकांच्या उत्पादनात ४५-५०% पर्यंत वाढ होते, असे संशोधनात दिसून आले आहे. सहकार्य हीच उत्तम नीती आहे. काही प्रजाती प्रदूषक काढण्यात, तर काही वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यात अधिक उत्तम आहेत. त्यांना एकत्र करून आम्ही एका कार्यक्षम चमूची निर्मिती केली आहे.

संशोधनानुसार काही प्रजातींचे जीवाणू सेंद्रिय प्रदूषक काढून टाकण्यात विशेष सक्षम आहेत. हे जीवाणू प्रदूषक खाऊन त्यांचे निरूपद्रवी आणि सोप्या स्वरूपाच्या घटकांमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे ते नैसर्गिक साफसफाई करणारे म्हणून काम करतात.

- प्रा. प्रशांत फळे, जैवविज्ञान व जैवअभियांत्रिकी विभाग

logo
marathi.freepressjournal.in