स्तनाच्या कर्करोगावरील प्रतिरोधक जीनोमिकांचा शोध; टाटा मेमोरियल सेंटरचा दावा, भारतीय महिलांमध्ये कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण

टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स, पश्चिम बंगाल येथील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील संप्रेरक उपचारांना प्रतिरोधक ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण जीनोमिक घटकांचा शोध लावल्याचा दावा बुधवारी केला.
स्तनाच्या कर्करोगावरील प्रतिरोधक जीनोमिकांचा शोध; टाटा मेमोरियल सेंटरचा दावा, भारतीय महिलांमध्ये कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण
PM
Published on

मुंबई : टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स, पश्चिम बंगाल येथील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील संप्रेरक उपचारांना प्रतिरोधक ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण जीनोमिक घटकांचा शोध लावल्याचा दावा बुधवारी केला.

भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग असून तो एकूण महिला कर्करोगाच्या २८.२ टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे. दरवर्षी या प्रकारच्या सुमारे २ लाख नवीन प्रकरणांची नोंद होते.

यापैकी ५०-६० टक्के प्रकरणे अशी असतात, जी पेशीमध्ये इस्ट्रोजेन रिसेप्टर नावाचा प्रथिन घटक व्यक्त करतात, असे टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले.

या संशोधनात, संशोधकांना पुनरावृत्ती होणाऱ्या (रिलॅप्स) प्रकरणामागील तीन मुख्य कारणे सापडली, असे डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.

संशोधकांनी संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे कर्करोगाचे नमुने आणि सामान्य ऊतकांचे विश्लेषण केले आणि ट्यूमरमध्ये तीन मुख्य जीनमध्ये म्युटेशन, डीएनए दुरुस्तीतील कमतरता आणि टेलोमियर लहान होणे हे घटक आढळले. टेलोमियर हा क्रोमोसोमच्या टोकाला असलेला डीएनए अनुक्रम असून तो नुकसान होण्यापासून संरक्षण करतो, असे ते म्हणाले.

भारतीय लोकसंख्येतील आनुवंशिक विविधता आणि विशिष्ट कर्करोग नमुने लक्षात घेता, हे निष्कर्ष स्थानिक स्तरावर प्रभावी लक्ष्यित उपचार विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्सचे माजी संचालक आणि भारतीय सांख्यिकी संस्थान, कोलकाता येथील एमेरिटस प्राध्यापक प्रो. पार्थ मजुमदार यांनी सांगितले.

आमच्या अभ्यासात उपचार प्रतिरोधाच्या जैविक कारणांचा शोध घेतला आहे. भारतीय रुग्णांसाठी अचूक औषधोपचार सुधारण्यासाठी मूलभूत कर्करोग संशोधनात गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे, हे या अभ्यासातून स्पष्ट होते, असे मजुमदार यांनी नमूद केले.

या अभ्यासाला जैवतंत्रज्ञान विभागाने त्याच्या व्हर्च्युअल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कार्यक्रमांतर्गत निधी प्रदान केला.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्सचे सहयोगी प्राध्यापक आणि या अभ्यासाचे मुख्य संशोधक डॉ. बिस्वास यांनी सांगितले की, या शोधामुळे वैयक्तिकृत कर्करोग उपचाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

उपचार प्रतिकाराच्या उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख लवकर झाल्यास, त्यांच्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवून उपचारांचे परिणाम सुधारता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in