ठाकरेंच्या बैठकीत चार आमदारांच्या गैरहजेरीची चर्चा; खासदार फुटीवर चर्चा नाही, सरकारला जाब विचारण्याचा सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बोलावलेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
ठाकरेंच्या बैठकीत चार आमदारांच्या गैरहजेरीची चर्चा; खासदार फुटीवर चर्चा नाही, सरकारला जाब विचारण्याचा सल्ला
ठाकरेंच्या बैठकीत चार आमदारांच्या गैरहजेरीची चर्चा; खासदार फुटीवर चर्चा नाही, सरकारला जाब विचारण्याचा सल्ला (Photo-X/@ShivSenaUBT_)
Published on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बोलावलेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी संख्येने कमी असलात तरी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जनतेचे प्रश्न मांडताना कुठेही कमी पडू नका, अशी सूचना केली. या बैठकीत खासदार फुटीवर कोणतीही चर्चा झाली नाही. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर राज्य सरकारला जाब विचारण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन्ही सभागृहांतील कामकाजाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते. बैठकीत ठाकरे यांनी पक्षफुटीवर कोणतेही भाष्य न करता आमदारांना अधिवेशनासाठी कार्यक्रम दिला.

‘लाडकी बहीण’, नीट पेपरफुटीवर आवाज उठवा...

अधिवेशनात विरोधकांना बोलू दिले जात नाही. तरीही आपली भूमिका मांडण्यात कमी पडू नका, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. ‘लाडकी बहीण’ योजनेत ८१ लाख महिला अपात्र ठरल्या. त्यांचा विषयही अधिवेशनात उचलून धरण्याची सूचना ठाकरे यांनी केली. नीट पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिले.

आमदार अनुपस्थितीमबाबत दिली माहिती

या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिले. यामध्ये संजय पोतनीस, सुनील शिंदे, राहुल पाटील, संजय देरकर यांचा समावेश होता. यापैकी संजय देरकर हे गावी, संजय पोतनीस हे पुण्यात, राहुल पाटील हे विधान परिषद निवडणुकीत व्यग्र होते. तर सुनील शिंदे हेही गावी असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नसल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बैठकीत भर

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भर दिला. ज्या फुटलेल्या खासदारांनी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जाते. हे खासदार शिवसेना ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर निवडून आले असताना त्यांना पक्षप्रवेश कसा दिला जातो, असा सवाल जाधव यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in