आमदार अपात्रता : १४ तारखेला सुनावणी घटनेच्या सर्व तरतुदींचे पालन करून निर्णय -राहुल नार्वेकर

विधानसभाध्यक्षांसमोर होणारी सुनावणी किचकट असणार आहे
आमदार अपात्रता : १४ तारखेला सुनावणी घटनेच्या सर्व तरतुदींचे पालन करून निर्णय -राहुल नार्वेकर

मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांची आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांची सुनावणी होणार आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होईल. दरम्यान, या संदर्भात मी जो निर्णय घेईन तो अर्धन्यायिक स्वरूपाचा असल्याने जी कारवाई होईल ती नियमानुसारच होईल. घटनेतील सर्व तरतुदींचे पालन करण्यात येईल. सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देणार असून कायद्यानुसार योग्य असाच निर्णय घेऊ, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जून २०२२ मध्ये कोसळले. त्यानंतर शिंदे सरकार सत्तारूढ झाले. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला. आमदार अपात्रतेचा मुद्दा आता विधानसभाध्यक्षांकडे आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे ४०, तर उबाठा गटाचे १४ आमदार या सुनावणीला हजर राहतील. विधानसभाध्यक्षांसमोर ३४ याचिकांची सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूच्या आमदारांना त्यावर आपले म्हणणे मांडता येणार आहे.

विधानसभाध्यक्षांसमोर होणारी सुनावणी किचकट असणार आहे. पक्षप्रमुख कोण होते. प्रतोद कोण होते. पक्षाची घटना काय सांगते. याचसोबत कोणाचा पक्षादेश ग्राह्य धरायचा यापासून इतर सर्व बाबींची तपासणी अध्यक्षांना करावी लागणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in