जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी; मंगलप्रभात लोढा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत पालक मंत्री मंगलप्रभात लोढा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी;  मंगलप्रभात लोढा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी
Published on

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत पालक मंत्री मंगलप्रभात लोढा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. बैठकीत विविध मुद्यांवर बोलण्यास वेळ देण्यात येत नसल्याने खासदार संजय दिना पाटील आक्रमक झाले. त्यामुळे उपनगर पालक मंत्री आणि खासदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने बैठक वादळी ठरली.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार संजय दिना पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार विद्या ठाकूर, आमदार डॉ. भारती लव्हेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार नवाब मलिक, आमदार रमेश कोरगांवकर, आमदार ऋतुजा लटके, आमदार दिलीप लांडे, आमदार प्रकाश फातर्पेकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार झिशान सिद्धिकी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांनी विविध विषय मांडण्यास सुरुवात केली. त्याला पालक मंत्र्यांनी आक्षेप घेतला. त्यावरून खासदारांना विषय मांडू देण्यात येत नसल्यावरून संजय दिना पाटील आक्रमक झाले. यामध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावरून पालक मंत्री आणि खासदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या विश्वसनीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारणांसाठी भरीव उपाययोजनेकरिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in