भेटवस्तूंच्या बाजारात नव्या पर्यायांची रेलचेल! सुकामेवा, मिठाई, चांदीच्या नाण्यांना पसंती; कॉर्पोरेट क्षेत्रात गिफ्ट कार्ड, भेटींचा वाढता ट्रेंड

दिवाळी सणाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत भेटवस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. शुक्रवारी ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी, तर रविवार, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीचा हंगाम सुरू झाला आहे.
भेटवस्तूंच्या बाजारात नव्या पर्यायांची रेलचेल! सुकामेवा, मिठाई, चांदीच्या नाण्यांना पसंती; कॉर्पोरेट क्षेत्रात गिफ्ट कार्ड, भेटींचा वाढता ट्रेंड
भेटवस्तूंच्या बाजारात नव्या पर्यायांची रेलचेल! सुकामेवा, मिठाई, चांदीच्या नाण्यांना पसंती; कॉर्पोरेट क्षेत्रात गिफ्ट कार्ड, भेटींचा वाढता ट्रेंड
Published on: 

मुंबई : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत भेटवस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. शुक्रवारी ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी, तर रविवार, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीचा हंगाम सुरू झाला आहे. मिठाई आणि सुकामेव्याच्या बॉक्सला आजही मागणी असली, तरी बदलत्या जीवनशैलीनुसार भेटवस्तूंचे स्वरूपही बदलले आहे. चांदीची नाणी, आकर्षक हॅम्पर, गिफ्ट कार्ड, वेलनेस उत्पादने आणि पर्यावरणपूरक वस्तूंकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

यंदा सुकामेव्याच्या किमती वाढल्याने दिवाळीच्या भेटवस्तूंचे बजेटही वाढले आहे. विशेषतः पिस्ते आणि खजुराच्या दरात मोठी वाढ झाल्याने कंपन्यांकडून हॅम्परचे वजन कमी करण्याचा किंवा पर्यायी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. बदामाचा घाऊक दर किलोमागे सुमारे १,१०० रुपये, पिस्ता १,८०० रुपये, काजू ९०० ते १,२०० रुपये, तर अक्रोड १,१०० ते १,४०० रुपये आहे.

चांदीच्या नाण्यांना, मूर्तींना पसंती

सोन्याचे दर विक्रमी पातळीवर असल्याने मध्यमवर्गीय ग्राहक चांदीच्या नाण्यांना, मूर्तींना आणि सजावटीच्या वस्तूंना पसंती देत आहेत. पारंपरिक मिठाईऐवजी चांदीची भेट देण्याकडेही काही ग्राहकांचा कल आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ग्राहक, व्यावसायिक भागीदार आणि ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना लोगो कोरलेली सोन्या-चांदीची नाणी देण्याची पद्धत कायम आहे.

गिफ्ट कार्ड, रिवॉर्ड कॅटलॉग लोकप्रिय

कॉर्पोरेट भेटवस्तूंच्या पद्धतीतही बदल झाला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला एकसारखे हॅम्पर देण्याऐवजी त्यांना स्वतःच्या पसंतीनुसार भेट निवडण्याची संधी देणारी गिफ्ट कार्ड आणि रिवॉर्ड कॅटलॉग पद्धत लोकप्रिय होत आहे. दूरस्थ पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल गिफ्ट कार्ड उपयुक्त ठरत आहेत.

भेटवस्तूंचे दर

दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी ग्राहकांना २५० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागत आहे. लहान मिठाई किंवा सुकामेव्याचा बॉक्स २५० ते ५०० रुपये, सामान्य हॅम्पर ५०० ते १,५०० रुपये, चांगल्या दर्जाचा हॅम्पर १,५०० ते ३,००० रुपये, तर प्रीमियम भेटवस्तूंचे दर तीन ते पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहेत. गिफ्ट कार्ड आणि व्हाऊचरची किंमतही ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)