
मुंबई : दिवाळीचा प्रकाश आणि रंग घराघरात आनंद घेऊन येतो, पण या उत्सवाबरोबरच वाढणाऱ्या हवेतील प्रदूषणाविरुद्ध खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. फटाक्यांच्या धुरातून, रसायनांमधून आणि सूक्ष्म धुळीतून निर्माण होणारे घटक त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेसाठी हानिकारक ठरू शकतात.
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे अंतर्गत औषध विभागाचे संचालक डॉ. अमित सराफ यांनी सांगितले की, फटाके फुटल्यावर त्यातून सूक्ष्म कण आणि जड धातू हवेत दीर्घकाळ राहतात. हे कण इतर हवेतील प्रदूषकांबरोबर एकत्र येऊन दाट धूर किंवा स्मॉग तयार करतात, जो चेहऱ्यावर, हातांवर आणि डोळ्यांवर बसतो. त्वचा हा शरीराचा संरक्षक थर असला तरी या प्रदूषणामुळे ती बंद, कोरडी आणि सूजलेल्या अवस्थेत जाते,” असे त्यांनी सांगितले.
कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना या काळात खाज, लालसरपणा किंवा पुरळसदृश प्रतिक्रिया जाणवू शकतात. डोळ्यांभोवतीची त्वचा नाजूक असल्याने ती धूर आणि हवेत तरंगणाऱ्या कणांमुळे अधिक त्रासदायक ठरते.
एनआयओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आदित्य केळकर यांच्या मते, दिवाळीत डोळ्यांमध्ये होणाऱ्या जळजळीचे मुख्य कारण म्हणजे फटाक्यांच्या धुरात असलेली रासायनिक घटक. ‘धुरातील रसायने आणि सूक्ष्म कण डोळ्यांत लालसरपणा, खाज, चुरचुर आणि पाण्याचा अतिरेक करतात. अगदी थोड्या वेळाच्या संपर्कानेही ॲॅलर्जी किंवा संवेदनशील लोकांना डोळ्यांमध्ये अस्वस्थता जाणवू शकते,’ असे ते म्हणाले.
डॉ. केळकर यांनी सांगितले की, फटाके हाताळणाऱ्या मुलांवर नेहमी प्रौढांनी लक्ष ठेवावे आणि सुरक्षित अंतर राखावे. डोळ्यांसाठी संरक्षणात्मक चष्म्यांचा वापर केल्यास ठिणग्या, धूर आणि कचरा यापासून जखमा टाळता येतात,’ असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. सराफ यांच्या मते, वेळेचे नियोजन केल्याने प्रदूषणाचा परिणाम कमी करता येतो. ‘फटाके संध्याकाळी लवकर फोडणे आणि प्रदूषणाच्या शिखर वेळेत खिडक्या बंद ठेवणे योग्य ठरेल. घरात एअर प्युरिफायर किंवा एक्झॉस्ट फॅन वापरल्यास हवेमधील धूर कमी होतो आणि आरोग्य टिकवून ठेवता येते,” असे त्यांनी सांगितले.
वॉक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील अंतर्गत औषधतज्ज्ञ डॉ. ऋतुजा उगाळमूळे यांनी सांगितले की, वृद्ध व्यक्ती विशेषतः संवेदनशील असतात. ‘मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदय व फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांना प्रदूषण आणि दिनक्रमातील बदलांचा अधिक परिणाम होतो,’ असे त्या म्हणाल्या. कुटुंबीयांनी या काळात नियमित जेवण, पाण्याचे सेवन आणि औषधांचा वेळ सांभाळावी तसेच खजूर किंवा नैसर्गिक गोडपणाच्या घटकांनी बनवलेले मधुमेही-अनुकूल गोड पदार्थ द्यावेत, असा त्यांनी सल्ला दिला.
हृदयशल्य चिकित्सक डॉ. पवन कुमार यांनी इशारा दिला की, प्रदूषणामुळे दम्याचे आणि हृदयविकाराचे त्रास वाढू शकतात. वृद्धांनी फटाके फोडण्याच्या वेळेत घरात राहावे, औषधे जवळ ठेवावीत आणि एअर प्युरिफायर असल्यास त्याचा वापर करावा,” असा त्यांनी सल्ला दिला.
डॉक्टरांनी सांगितले की, बाहेर जाणे मर्यादित ठेवणे, डोळे व त्वचेचे संरक्षण करणे आणि संतुलित आहार घेणे आदी गोष्टी पाळल्यास सर्वांना सुरक्षित आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करता येईल.