श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने मुंबईत साजरी होणार दिवाळी

मुंबईत राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने मुंबईत साजरी होणार दिवाळी

प्रतिनिधी/मुंबई : सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मान्यवर या सोहळ्यास उपस्थित असतील. मुंबईसह देशभरात या सोहळ्याच्या निमित्ताने अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात या सोहळ्याच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबईत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रा देखील निघणार आहेत. घरा-घरांमध्ये लाखो दिव्यांची रोषणाई करण्यात येणार असून, या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिवाळीच साजरी होणार आहे. भाजपने देखील या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने या दिवशी आधीच अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईत राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक मंदिरांची साफसफाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: साफसफाई मोहिमेत भाग घेतला आहे. अनेक सेलिब्रिटी देखील या मोहिमेत सहभागी होत आहेत. दिवसभर मुंबईत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक दिवा प्रभू श्रीरामचंद्रासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून २५ हजार दिव्यांची महाआरती होणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी राममंदिराच्या प्रतिकृतीची उभारणी करण्यात आली आहे. जागोजागी शोभायात्रा निघणार आहेत. संतसंमेलने व रामलीला आयोजित करण्यात आली आहे.

गल्लोगल्ली भाजपचे बॅनर

मुंबईत या निमित्ताने आधीच वातावरण निर्मिती करण्यात भाजपला यश आले आहे. गल्लोगल्ली भाजपचे बॅनर लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील यात आघाडी घेतली आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दोन्ही पक्षांनी बॅनर लावले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोहळ्याचे आमंत्रण असले, तरी ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत. ते नाशिक येथे जाणार आहेत. ठाकरे गटाकडून मात्र बॅनरबाजी करण्यात आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in