
मुंबई : गेल्या १६ वर्षांपासून बेस्टच्या सेवेत कायमस्वरुपी भरती करा, नैमित्तिक कामगारांच्या लढ्याला यश आले आहे. ७२५ नैमित्तिक कामगारांपैकी १२३ कामगारांना कायमस्वरुपी बेस्टच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन पालिका आयुक्त व बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापकांनी दिल्याचे द इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील ७२५ नैमित्तिक कामगार १६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न असलेल्या द इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी तात्काळ कामगारांची भेट घेतली. बेस्ट उपक्रमातील ह्या ७२५ नैमित्तिक कामगारांमध्ये ९० टक्के कामगार मराठी असून, बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना विद्युत विभागात अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्याऐवजी, नैमित्तिक कामगार म्हणून रोजंदारीवर घेण्यात आले होते. यामुळे कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी १६ वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरु होता.
कामगारांची बाजू जाणून घेतल्यावर आमदार लाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्टच्या १२३ कंत्राटी कामगारांना तात्काळ कायमस्वरुपी सेवेत घेणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी तसेच बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी दिल्याचे प्रसाद लाड म्हणाले.
प्रतिक्रिया
१६ वर्षांनंतर प्रतीक्षा संपली!
कामगारांचे हित जोपासणे हेच श्रमिक उत्कर्ष सभा कामगार संघटनेचे प्रथम कर्तव्य असून, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे असलेल्या बेस्ट कामगार सेनेने, बेस्टच्या या नैमित्तिक कामगारांना एवढी वर्षे न्याय दिला नव्हता. श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून १६ वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला.
- प्रसाद लाड, द इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष