समीर वानखेडेंच्या कारवाईंची चौकशी करणाऱ्या ‘एनसीबी’चे ज्ञानेश्वर सिंह यांची उत्तर भारतात बदली

‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील कारवाईत आर्यन खानला अटक केली होती.
Sameer Wankhede
Sameer Wankhede

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘एनसीबी’च्या तपासातील त्रुटी उघड करणारे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची उत्तर भारतात बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडेंच्या या प्रकरणाच्या तपासातील संशयास्पद भूमिकेची ज्ञानेश्वर सिंह यांनी चौकशी केली होती. त्यानंतर वानखेडे यांनी अलीकडेच ज्ञानेश्वर सिंह यांनी चौकशीदरम्यान आपला छळ केल्याचा आरोप करीत ॲट्रोसिटी कायद्याखाली त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील कारवाईत आर्यन खानला अटक केली होती. या घटनेमुळे त्यावेळी एकच खळबळ उडाली होती, मात्र नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही सगळी कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप केला. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे ‘एनसीबी’कडून या प्रकरणाचा अंतर्गत तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

त्यावेळी ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईची चौकशी केली. या चौकशीअंती ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईतील अनेक त्रुटी समोर आणल्या होत्या. परिणामी, नंतरच्या काळात ‘एनसीबी’कडून आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट देण्यात आली. ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालामुळे आर्यन खान निर्दोष सिद्ध होण्यास मदत झाली होती.

ज्ञानेश्वर सिंह महाराष्ट्र आणि गोव्याचे ‘एनसीबी डीडीजी’ होते, मात्र आता त्यांची भरती उत्तर भारतात करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, चंदिगड, लडाख, मध्य प्रदेश, राजस्थान, दीव-दमण आणि दादरा नगर हवेली येथील जबाबदारी असेल.

ज्ञानेश्वर यांच्या जागी सचिन जैन

ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्या अहवालात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या पथकाने आर्यन खान प्रकरणात नियमांचे पालन न केल्याची टिप्पणी केली होती. नंतरच्या काळात समीर वानखेडे यांनी सर्वोच्च न्यायालयात ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची तक्रार केली. मात्र, या सगळ्या प्रकरणानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून गच्छंती करण्यात आली व त्यांना पुन्हा भारतीय महसूल खात्यात पाठवण्यात आले. दरम्यान, ज्ञानेश्वर सिंह यांच्यानंतर आता महाराष्ट्र आणि गोव्याचे ‘एनसीबी डीडीजी’ म्हणून सचिन जैन काम पाहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in