मुंबई : मुंबईत मालाड येथे एका व्यक्तीने ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये चक्क मानवी बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी, ओर्लेम ब्रेण्डन सेराव (२७) यांनी झेप्टोद्वारे कोन आइस्क्रीम मागविले. आइस्क्रीम घरी येताच ओर्लेमने ते उघडून ताव मारण्यास सुरुवात केली खरी, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. आइस्क्रीम खाताना त्यांच्या जिभेला काहीतरी टोचले, त्यामुळे आइस्क्रीममध्ये नक्की काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ते बाहेर खेचले आणि त्यांना धक्काच बसला. आइस्क्रीममध्ये त्यांना दोन सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. ओर्लेम यांनी याची माहिती मालाड पोलीस ठाण्याला दिली आणि त्यानंतर पोलिसांनी बोटाचा तो तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारानंतर जेथे आइस्क्रीम तयार केले जाते आणि जेथे त्याचे पॅकिंग केले जाते त्या जागांची तपासणी करण्यात येणार आहे. आइस्क्रीम उत्पादकाशी याबाबत सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उत्पादकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे समजते.