डॉक्टरांवर वाढतोय मानसिक ताण; दिवसाला सरासरी नऊ डॉक्टरांचे हेल्पलाईनवर कॉल

वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये, डॉक्टरांमध्ये वाढणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले जात आहे. महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या एका विशेष हेल्पलाईनवर मिळालेल्या प्रतिसादानुसार, ही गरज ठळकपणे समोर येत आहे.
डॉक्टरांवर वाढतोय मानसिक ताण; दिवसाला सरासरी नऊ डॉक्टरांचे हेल्पलाईनवर कॉल
Published on

मुंबई : वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये, डॉक्टरांमध्ये वाढणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले जात आहे. महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या एका विशेष हेल्पलाईनवर मिळालेल्या प्रतिसादानुसार, ही गरज ठळकपणे समोर येत आहे. महिन्यात २६० एमबीबीएस आणि निवासी डॉक्टरांनी समुपदेशनासाठी संपर्क केला असून, दिवसाला सरासरी नऊ कॉल येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे वाढत्या मानसिक तणावाचे लक्षण आहे. निवासी डॉक्टरांमध्ये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्य सहाय्याच्या कमतरतेचेही हे निदर्शक आहे.

ऑगस्टच्या मध्यात, डॉक्टरांमध्ये वाढणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी FAIMA (फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन) ने एक ३६५ दिवसांची 'मेंटल हेल्थ रिड्रेसेल हेल्पलाईन' (MHRH) सुरू केली.

वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक विद्यार्थी तीव्र तणाव अनुभवतात आणि व्यावसायिक आयुष्यात प्रवेश केल्यानंतर तो तणाव अधिक वाढतो. लांब कामाचे तास, रुग्णांचा भार, संस्थात्मक पाठिंब्याचा अभाव आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण या सर्व गोष्टी मानसिक तणाव वाढवतात.वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत. गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात १३ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, यामध्ये ५ MBBS विद्यार्थी आणि ८ पदव्युत्तर विद्यार्थी होते.

काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक समस्या कारणीभूत होत्या. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी विषारी रुग्णालयीन वातावरण, वरिष्ठांचे त्रास देणे, कामाचा अति ताण, आणि रॅगिंग ही कारणे दिली आहेत. या ताणामुळे अनेक वेळा विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात किंवा दुर्दैवाने आत्महत्या करतात.

FAIMA ची ही हेल्पलाईन अशा डॉक्टरांसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे. ही हेल्पलाईन डॉक्टरांना मानसिक तणावाशी सामना करण्यासाठी व्यावसायिक आधार, समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शन पुरवते.

यामुळे डॉक्टर त्यांच्या जबाबदारीच्या आणि अत्यंत मेहनतीच्या व्यवसायात स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकतील.

डॉक्टरांना समुपदेशन आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ऑगस्टमध्ये ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. याला प्रतिसाद मिळत असून, मानसिक आरोग्य सहाय्याची गरज स्पष्ट होते.

- डॉ. अक्षय डोंगारदिवे, अध्यक्ष, FAIMA

विविध भाषांमध्ये समुपदेशन

या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी ८० हून अधिक मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ते मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम आणि बंगाली अशा अनेक भाषांमध्ये समुपदेशन करत आहेत आणि गरज असल्यास औषधांचाही सल्ला देत आहेत.

तणावाची कारणे

हेल्पलाईनवर कॉल करणाऱ्या डॉक्टरांनी अनियमित ड्युटी तास, अति कामाचा ताण, झोपेचा अभाव, आणि रुग्णालय प्रशासनाकडून सहकार्याचा अभाव या प्रमुख तणावदायक कारणांची माहिती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in